मुंड्या-फिंड्याचं नावही घेत नाही, पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर...; मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंड्या-फिंड्याचं नावही घेत नाही, पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर...; मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

मुंड्या-फिंड्याचं नावही घेत नाही, पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर...; मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

Jan 04, 2025 06:24 PM IST

Manoj Jarange Patil On Dhananjay Munde: सर्वपक्षीय मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

मनोज जरांगेंचा धनंजय मुंडे यांना थेट इशारा
मनोज जरांगेंचा धनंजय मुंडे यांना थेट इशारा

Manoj Jarange Patil News: बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी शनिवारी परभणी शहरात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचे नाव घेतले नाही. पण देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर, धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही त्यांनी इशारा दिला. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मागतोय तर, आम्ही जातीयवादी कसे? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

परभणी शहरातील सर्वपक्षीय मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात असल्याची माहिती दिली. जरांगे म्हणाले की, 'संतोष देशमुख यांचा भाऊ न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय आणि जेव्हा ते पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा त्यांना धमकी देण्यात आले. पण यापुढे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पु्न्हा त्रास झाला तर, धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. परळी असो किंवा बीड समाजाला त्रास झाला तर, घरात घुसून मारायचे. देशमुख यांच्या कुटुंबाच्या मागे सगळा मराठा समाज उभा आहे. आम्ही कायद्याला मानतो म्हणून शांत आहोत. देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना पकडले जातील, त्यांना फासावर चढवले जाईल, असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

धनंजय मुंडेंना रस्त्याने फिरू देणार नाही

'धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यात धमकविण्यात आले, अशी माहिती आम्हाला मिळाली. पण यापुढे संतोष देशमुख यांचे कुंटुब आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या केसाला धक्का लागला तरी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. आमचा भाऊ गेला, ते आम्ही सहन केले. पण यापुढे त्यांना डबल त्रास झाला तर, एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही', असा इशारा जरांगे यांनी दिला.

आम्ही न्याय मागणारे जातीयवादी, मग आरोपींना सांभाळणारे तुम्ही कोण?

‘आम्ही संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागतोय, तर आम्हाला जातीयवादी म्हटले आणि तुम्ही आरोपींना सांभाळता, मग तुम्ही कोण?' असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. 'संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली, ते जातीयवादी नाही का? त्यांना काहीही म्हणू द्या. पण समाज म्हणून आपल्याला लढावे लागेल', असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले?

संतोष देशमुख प्रकरणातील आणखी दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आले. यावर बोलतान जरांगे पाटील म्हणाले की, ‘आम्हाला माज किंवा मस्ती नाही. पण तुम्ही लोकांना मारून आरोपींना घरात लपवून ठेवत असाल तर, हे कसे काय सहन करायचे. पण माझा एक प्रश्न आहे, सर्व आरोपी नेमके पुण्यातच कसे सापडायला लागले. याचा अर्थ सरकारमधील मंत्री त्यांना संभाळत होते, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.’

आरोपींची नार्को टेस्ट करा

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर खंडणीचा आणि हत्येचा आरोप आहे. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींची नार्को टेस्ट करा. या सगळ्या प्रकरणात मोठे रॅकेट आहे.नार्को टेस्ट झाली तर, आरोपींचा आकडा थेट ५०-६० पर्यंत जाईल, असा दावाही जरांगे यांनी केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर