Walmik Karad News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकमोठी बातमी समोर आली असून देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्यावाल्मीक कराडला न्यायालयाने मकोका लावला आहे, तसेच त्याला १४ दिवसांची कोठडीही सुनावली आहे. आज कराडची कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्यावर मकोका लावण्याचा निर्णय दिला. याची माहिती मिळताच परळीत कराडचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे. शहरातील बाजारपेठा बंद ठेवल्या असून रस्त्यांवर टायर पेटवण्यात आले आहे. त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीडमध्ये गाजत असलेले संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh case) या आधी या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं होतं. आता वाल्मिक कराडलाही या कायद्याच्या अंतर्गत आणण्यात आलं आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांकडून मागणी होत होती, वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण गेला होता. मात्र त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती. या मागणीसाठी संतोष देशमुख यांच्या भावाने सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं.
परळी शहरात सध्या कडकडीत बंद असून वाल्मीक कराडच्या समर्थकांनी रस्त्यांवर टायर पेटवून या कारवाईचा निषेध केला. आज मकरसंक्रांतीनिमित्त बाजारपेठ गर्दीने सजली होती. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक समर्थकांनी दिली. त्यामध्ये मुख्य बाजारपेठ मोंढा, टावर, बाजार समिती रोड, बस स्टँड रोड सगळीकडील व्यापार बंद करण्यात आले. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करायला लावली.
वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुळाशी हेच खंडणी प्रकरण असल्याचा संशय पोलिसांना आहे.
दरम्यान, वाल्मीक कराडला आज बीड जेलमध्ये नेले जाणार आहे. न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले जाईल. त्यानंतर उद्या मकोकाअंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या