Santosh Deshmukh Murder News Update : संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. तरी सुद्धा आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे. या हत्येप्रकरणी आज ग्रामस्थांनी व संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढत आत्महत्या करण्याचा इशारा दिला. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी धनंजय देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जरांगे यांनी हात जोडून त्यांना खाली येण्याची विनंती केली. मात्र, तरी सुद्धा ते खाली आले नाही. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
वाल्मीक कराडवर मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख व ग्रामस्थांनी रविवारी केली होती. या साठी आज धनंजय देशमुख यांनी व ग्रामस्थांनी थेट गावाच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. देशमुख यांनी हे आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. मात्र, या सर्व पोलिसांना चुकवून धनंजय हे थेट पाण्याच्या टाकीवर चढून वर गेले यावेळी काही ग्रामस्थ देखील त्यांच्या सोबत होते.
स्थानिक नागरिकांनी त्यांना खाली येण्याची विनंती केली, मात्र काहीही झालं तरी खाली येणार नाही, अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी घेतली आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडवर मोक्का लागत नाही व फरार आरोपी कृष्णा आंधळेला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पावित्रा देशमुख यांनी घेतला आहे. सध्या ग्रामस्थ त्यांची मनधरणी करत आहेत. मात्र, धनंजय देशमुख मागे हटायला तयार नाहीत.
यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी धनंजय देशमु यांना चार वेळा फोन केला व खाली येण्याची विनंती केली. त्यांनी त्यांना खालून हात जोडून खाली या असे म्हटले, मात्र, धनंजय देशमुख यांनी खाली येण्यास नकार दिला आहे. जरांगे म्हणाले, मी तुमच्यासोबत आहे, खाली या. आपल्याला माणूस महत्त्वाचा आहे. जीव देऊन चालणार नाही. कुटुंबाला आधार कोण आहे. तुम्ही खाली या, तुमच्यासमोर हात जोडतो, असे म्हणत धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
अशातच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हीदेखील पाण्याच्या टाकीवर चढून तिने आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाण्याच्या टाकीवर चढण्यासाठी शिडी उपलब्ध नसल्याने पोलिसांनी अग्निशामन दलाला पाचारण केले आहे. शिडीचा वापर करुन पोलीस पाण्याच्या टाकीवर जाऊन देशमुख यांचे आंदोलन मोडण्याची शक्यता आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी मुख्य आरोपी अजूनही मोकाट कसा? त्याला का ३०२ च्या कलमाखाली अटक करण्यात आली नाही? असा संताप व्यक्त करत देशमुख यांनी सवाल उपस्थित केला. यावेळी जमलेल्या महिलांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्यावर बांगड्या सुद्धा फेकल्या.
संबंधित बातम्या