मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ! १० वर्षांपासून असलेला गड कोसळलला; धनंजय मुंडे गटाची सरशी

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ! १० वर्षांपासून असलेला गड कोसळलला; धनंजय मुंडे गटाची सरशी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 03, 2022 12:49 PM IST

Pankaja Munde : गेल्या १० वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या पांगरी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. धनंजय मुंडे गटाने या निवडणुकीत बाजी मारली असून पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

धनंजय मुंडे -पंकजा मुंडे
धनंजय मुंडे -पंकजा मुंडे

बीडः पक्ष पातळीवरुन संघर्ष करत असलेल्या भाजपनेत्या पंकजा मुंडे यांना आता त्यांच्या मतदार संघातील दबदबा कायम ठेवण्यासाठी झगडावे लागणार आहे. त्यांचे मतदार संघातील वर्चस्व कमी होत असून नुकतेच एका निवडणुकीत त्यांच्या गटाच्या परभवामुळे सिद्ध झाले आहे. बीडमधील परळीच्या पांगरी येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला असून आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. तब्बल १० वर्षानंतर या सोसायटीवर धनंजय मुंडे गटाला आपले वर्चस्व सिद्ध करता आले आहे.

पांगरी या ठिकाणी गोपीनाथ गड आहे. हा परिसर पंकजा मुंडे यांचा गड मानला जातो. मात्र, पंकजा मुंडे यांच्या या गडाला धनंजय मुंडे यांनी खिंडार पाडले असून पंकजा मुंडे यांच्या राजकीय प्रभावावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. धनंजय मुंडे यांच्या जवळचे समजले जाणारे परळी नगरपरिषदेचे गट नेते वाल्मिकी कराड यांचे गाव पांगरी आहे. त्यांनी या निवडणुकीचे गणित जुळवत हा विजय धनंजय मुंडे गटासाठी खेचून आणला आहे. विधान सभा निवडणुकीतही वाल्मिकी यांनी मुंडे यांना या गटातून मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. वाल्मिक कराड यांचा या गटात मोठा दबदबा आहे. सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पांगरी सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर पांगरीच्या ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांना साथ देत येथील महत्वाची समजली जाणारी ही सेवा सहकारी सोसायटी त्यांच्या ताब्यात दिली होती. गेल्या १० वर्षांपासून या सोसायटीवर त्यांनी निर्विवाद वर्चस्व ठेवले होते. मात्र, या सोसायटीच्या झालेल्या निवडणुकीत दोन्ही बहीण भावाच्या गटात चुरशीची लढाई झाली. पांगरी सोसायटी धनंजय मुंडेंच्या ताब्यात गेल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का समजला जातोय. दरम्यान निवडणूक विजयानंतर धनंजय मुंडेंच्या गटाने मोठा जल्लोष केला आहे.

दरम्यान, या निवडणुकीच्या परभवामुळे पंकजा मुंडे यांच्या राजकीय प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचा हा गड समजला जातो. १२ वर्षांपासून पंकजा मुंडे हा गड सांभाळत होत्या, मात्र, आता त्यांचा मतदार संघातील प्रभाव कमी होत असतांना दिसत आहे. त्यांच्या भोवती सतत गराडा घालून फिरणाऱ्या काही कार्यकर्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक पंकजा मुंडे यांच्या पासून दुरावले गेल्याचे बोलले जात आहे. या सोसायटीच्या निवडणुकीत त्यांचा झालेला हा पराभव हे त्याचेच द्योतक आहे, असे म्हटले जाते.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग