Beed Morcha : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून या घटनेचचा सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आता या घटनेविरोधात उद्या (२८डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत. ‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या’ असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी १० वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चाला जवळपास ५० गावातील लोक जमणार असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी हा मोर्चा आंबेडकर चोकातून पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु याता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात मोठमोठे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत. तसेच या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील या बॅनर्सच्या माध्यमातून लोकांना करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर काही नेते उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार असल्याने पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती हिली. ५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा शहरात व मोर्चाच्या मार्गावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.
मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील दोषींना तात्काळ शिक्षा करण्यात यावी,जे लोक फरार आहेत त्यांना अटक करण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा. इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. संतोष देशमुख यांच्या कुटूंबातील अनेक सदस्य या मोर्चात सहभागी होणार आहेत.
संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम अहवालानुसार त्यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली असून ४ आरोपी फरार आहेत. वाल्मिकी कराड यांना अटक करा,अशी संतोष देशमुख यांचे नातेवाईक, विरोधकांसह ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी देखील दाखल झाले आहेत. आता बीडमध्ये भव्य मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करून सूत्रे नवनीत कावत यांच्याकडं देण्यात आली. मात्र अजूनही फरार आरोपी मोकाट आहेत.
संबंधित बातम्या