Beed Crime News : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर मोठे राजकारण सुरू असतांना परळीमध्ये मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. परळी येथील बँक कॉलनीत काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला असून या घटनेत एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेले मरळवाडीचे विद्यमान सरपंच बापूराव आंधळे यांचा या गोळीबारात जागीच मृत्यू झाला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते,बबन गीते या घटनेत जखमी झाले आहेत. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याची माहिती समजू शकली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वातावरण तणावपूर्ण आहे.
बीड जिल्ह्यात सध्या वातावरण तापले आहे. पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर त्याला पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. ही घटना ताजी असतांना शनिवारी रात्री परळी येथे बँक कॉलनीत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार गटातील धनंजय मुंडे समर्थक सरपंच बापूराव आंधळे हे जागीच ठार झाले आहे. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी झाले. या गोलिबाराची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे. त्यांनी तातडीने जखमी व्यक्तिंना उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले आहे.
या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून आरोपींना अटक करण्यासाठी तपास पथक स्थापन करण्यात आले असून ते रवाना करण्यात आले आहे. हल्ला नेमका कुणी केला तसेच का केला याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. या गोळीबारात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बबन गीते हे देखील जखमी झाले आहेत. त्यांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत.
मृत झालेले बापू आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांचे टक्कर समर्थक मानले जातात. जखमी ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक असून महादेव बबन गीते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत. या घटनेमुळे परिसरात तानावाचे वातावरण आहे. हा गोळीबार का केला याचा पोलिस शोध घेत आहेत.