बीड जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीडचं राजकारण आणि गुन्हेगारी याविषयी संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी जिल्ह्यात काम करत असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित 'बीडची लोकशाही-एक भयाण वास्तव-A Law unto Itself' हे पुस्तक पुन्हा चर्चेत आलं आहे. कोचे यांनी या पुस्तकात बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था का बिघडली, तेथील राजकारण्यांची मानसिकता आणि जिल्ह्याची सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलं आहे. बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा उत्पन्न करतात, असं कोचे यांनी पुस्तकात लिहिले आहे.
सदानंद कोचे यांना महाराष्ट्रात प्रशासनिक अधिकारी म्हणून ३२ वर्ष काम केले आहे. चांदा ते बांदा अशा सर्व ठिकाणी विविध पदांवर काम केले आहे. शासकीय सेवेच्या अखेरीस दोन वर्ष ते बीडचे जिल्हाधिकारी होते. मात्र बीडसारखा अनुभव महाराष्ट्रात कुठेही आला नसल्याचं कोचे यांनी पुस्तकात मांडला आहे.
बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली होण्यापूर्वी कोचे हे सोलापूर जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी होतो. नागपूर या त्यांच्या मूळ गावी एका अर्जंट कामानिमित्त कारने सहकुटुंब जात असताना लातूरजवळ त्यांच्या गाडीसमोर एक माणूस आडवा आला होता. तेव्हाच त्यांनी स्वसंरक्षणार्थ रिव्हॉल्व्हर बाळगायचा निर्णय घेतला होता. बीडमध्ये बदली झाल्यानंतर येथील परिस्थिती पाहून आपण रिव्हॉल्व्हर बाळगलेच पाहिजे, असा ठाम निश्चय त्यांनी केला. बीडमध्ये अधिकाऱ्यांच्या संरक्षणार्थ दिलेले गार्ड, पोलीस हे स्थानिक असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं कोचे यांना वाटत होतं.
बीडचे जिल्हाधिकारी असताना कोचे त्यांच्या ब्रिफकेसमध्ये दररोज लोडेड रिव्हॉल्व्हर घेऊन फिरायचे. त्यामुळे सहसा धमक्यांचे फोन यायचे नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. एकदा एका आमदाराने कोचे यांना विचारलं, की ‘साहेब तुमच्या बॅगेमध्ये काय असतं’. तेव्हा कोचे यांनी त्या आमदाराला सांगितलं होतं की ब्रिफकेसमध्ये काही महत्वाचे कागदपत्रे असतात आणि सोबत एक लोडेड रिव्हॉल्व्हर असते. त्या आमदाराने ही गोष्ट सपूर्ण जिल्ह्यात पसरवली होती. त्यानंतर धमक्यांचे फोन आले नसल्याचे कोचे सांगतात.
‘बीडची लोकशाही’ या पुस्तकात कुठेही बीडची तुलना बिहारसोबत करण्यात आलेली नाही. परंतु बीड हे बिहारच असल्याचं कोचे सांगतात. सगळ्याच खात्यातील अधिकाऱ्यांची हीच धारणा असल्याचे कोचे सांगतात. या पुस्तकाचे नाव ‘रिपब्लिक ऑफ बीड-A Law unto Itself'’ असं ठेवायचं होतं. परंतु एका अधिकाऱ्याने असे नाव ठेवू नका असा कोचे यांना सल्ला दिला होता. बीड जिल्ह्याची वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी या हेतुने पुस्तक लिहिलं असल्याचं कोचे सांगतात