Santosh Deshmukh murder case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यासह राज्यातील वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीवरून आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व नेत्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी करत धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा निर्णय घेत फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे आरोपींच्या गळ्याभोवतीचा फास आणखी आवळला आहे.
जवळपास २० दिवस उलटूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.आरोपींना तात्काळ अटक करत फाशी देण्यात यावी, अशी मागणी मोर्चातील लोकांनी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दोन महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना आदेश दिले आहेत की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी अद्याप फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. त्याचबरोबर रिव्हॉल्वहर सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांच्या बंदुकीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. तसेच बंदूक परवान्याचा फेरआढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे.
या हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, काल रात्री मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने व्हॉट्सअप कॉलवर बोलण्याची विनंती केली. पण नेटवर्क नसल्यामुळे आमचे बोलणे होऊ शकले नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने मला व्हॉईस नोट पाठवली. ज्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आता कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांची हत्या झाली, अशी माहिती त्या व्यक्तीने दिली. हे ऐकून मी हबकलेच.
ही माहिती मी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना दिली आहे. तसेच या तिघांचे मृतदेह कुठे पुरले? याचीही माहिती समोरच्या व्यक्तीने दिली आहे, असा खळबळजनक दावा अंजली दमानिया यांनी केला.