गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी एक ट्विट केलं आहे. आता या घरांच्या किमती ५० लाखांवरुन २५ लाख रुपयांवर करण्यात आलं असल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.
गेल्या काही दिवसात मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या (BDD Chawl) पुनर्वसनाचा (Redevolopment) प्रश्न मार्गी लागला तर होता मात्र त्यानंतर गृहनिर्माण विभागाने पोलीस कुटुंबांना (Police Quarters) घरं हवी असतील तर त्यासाठी बांधकाम खर्च म्हणून ५० लाख भरावे लागतील असं सांगितलं होतं. त्यावरुन राज्यात बराच वादंग पेटला होता. अनेक पोलिसांनी नोकरीची हयात संपली तरी इतके पैसे भरणं शक्य होणार नसल्याचं जाहीर सांगितलं होतं. त्यानंतर काही पोलीस कुटुंबांच्या महिलांनी आव्हाडांच्या बंगल्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. हा वॉर्ड आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आमदारकीच्या अखत्यारित येत असल्याने सहाजिकच मुख्यमंत्र्यांनी या पेचावर तोडगा काढण्याचं आश्वासन पोलीस कुटुंबांना दिलं होतं. आता तेच आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळलं असल्याचं पाहायला मिळतंय.
ट्रेंडिंग न्यूज
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याच संदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बीडीडी चाळीच्या पोलीस कुटुंबिय़ांना एक आवाहन केलं आहे. आता या घरांच्या किमती ५० लाखांवरुन २५ लाख रुपयांवर करण्यात आलं असल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो असून त्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
राज्यात सध्या सुरु असलेल्या अस्थिर वातावरणातही महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयातल्या आपापल्या दालनात रोज काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाडही आता आपल्या विभागाच्या महत्वाच्या फायलींवरुन हात फिरवताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकीकडे शिवसेनेच्या आमदारांनी बेबनाव असल्याचं दाखवंत सरकारला अस्थिर केलं आहे. तरीही आपला संयम कायम ठेवत राज्याचे आघाडी सरकारचे मंत्री आपापल्या विभागात आता महत्वाचे विषय हातावेगळे करताना पाहायला मिळत आहेत. हा त्यातलाच एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये पाहुया.
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि माझे नेते शरद पवारसाहेब ह्यांच्या सल्ल्या नुसार #BDD चाळी तील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी घर नावावर करून देण्यात आले
आता ती घर ५० लाख ऐवजी २५ लाख रुपयात देण्यात येतील
आता घर रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्यात
#२४तास_जनतेसाठी
असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. त्यामुळे बीडीडी चाळीतल्या पोलीस कुटुंबांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. आता या निर्णयामुळे बीडीडीच्या पोलीस कुटुंबांच्या रखडलेल्या इमारती नव्याने बांधण्यासाठी मोकळ्या केल्या जातील अशी अपेक्षा राज्य सरकारची आहे.