Maharashtra Legislative Council Elections 2024: लोकसभा निवडणुक संपल्यावर राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी एकूण ८८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध तहरले होते. यातील ३३ उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागणार आहे.
निवडणूक आयोगाने विधान परिषद आणि पदवीधर शिक्षण मतदार संघाच्या निवडणुका जाहिर केल्या आहेत. यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ या ४ जागांकरिता निवडणूक होणार आहे. काल अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी ३३ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने ५५ जण निवडणूक रिंगणात राहिले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात ८, कोकण विभाग पदवीधर मतदार संघात १३, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात २१, तर मुंबईतील शिक्षक मतदारसंघात एकूण १३ उमेदवार आपले भविष्य आजमवणार आहेत.
जून महिन्याच्या २६ तारखेला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या चार मतदारसंघात मतदान होणार आहे. सोमवारी १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. तर ५ जुलै रोजी निकाल लागणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण पदवीधर मतदार संघातून त्यांचा उमेदवार अभिजीत पानसे यांचे नाव मागे घेतले आहे. या ठिकाणी भाजपकडून निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवारी जाहिर झाल्यावर निरंजन डावखरे हे शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांना भेटले होते.
तर महाविकास आघाडीतील वाद देखील जवळपास संपला आहे. शिक्षक व पदवीधर निवडणुकी नाना पटोले यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपचे शिवनाथ दराडे आणि ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर उभे आहेत. तर शिक्षक भारतीचे सुभाष मोरे हे देखील या ठिकाणाहून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे या मतदार संघात तिहेरी रंगत होणार आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी सुद्धा माघार घेतली आहे.
संबंधित बातम्या