मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाणांनंतर आणखी एका बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का; अशोक चव्हाणांनंतर आणखी एका बड्या नेत्याचा पक्षाला रामराम

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 26, 2024 11:56 PM IST

Basavraj Patil Resigns from Congress : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता मराठवाड्यातील आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

Basavraj Patil Resigns from Congress
Basavraj Patil Resigns from Congress

महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून उद्याच (मंगळवार) भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

धाराशिव जिल्ह्यातील बडे नेते असलेले तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होत्या. अखेर मंगळवारी ते भाजपवासी होण्याचा मुहूर्त मिळाला आहे. सोमवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

बसवराज पाटील धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. उमरगा तालुक्यातील मुरूमचे रहिवासी आहेत. बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून ज्यांची ओळख आहे.

बसवराज काँग्रेसचे निष्ठावंत नेते मानले जायचे, औसा मतदारसंघातून २००९ व २०१४ मध्ये विधानसभेवर निवडून गेले होते. १९९९ साली ते उमरग्यातून आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये काँग्रेसने त्यांना राज्यमंत्रीपद दिले होते. मात्र, २०१९ मध्ये अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर बसवराज पाटील हे काँग्रेसमध्ये बाजुला पडले होते. गेल्या काही महिन्यापासून ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. 

IPL_Entry_Point