Mahajyoti Fellowship Paper Leak : महाज्योती पीएचडी फेलोशिपचा पेपर पुन्हा एकदा फुटला आहे. यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आज पुन्हा घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना सील नसलेले आणि झेरॉक्स असलेले प्रश्नसंच वितरित करण्यात आले. यामुले संतत्प विद्यार्थ्यांनी पुण्यातील विविध परिक्षा केंद्रावर सुरू असलेल्या या परीक्षेवर बहिष्कार टाकला. दरम्यान, आही परिक्षाच देत राहू की संशोधन करु, अशा संतत्प सवाल करत आम्हाला सरसकट फेलोशिप द्या अशी मागणी देखील विद्यार्थ्यानी यावेळी केली.
सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांची संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएचडी फेलोशीप) मिळविण्यासाठी बुधवारी (दि. १०) पुण्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या सावित्री बाई फुले सेट विभागाने ही परीक्षा आयोजित केली होती. दरम्यान, वडगाव येथील केंद्रावर मुलांना हा पेपर सील पॅक न देता झेरॉक्स कॉपी दिली गेली. यामुळे हा पेपर फुटला असल्याचे निष्पन्न झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षा ही या पूर्वी २४ डिसेंबरला घेण्यात आली होती.
मात्र, यावेळी २०१९ ची जुनीच प्रश्न पत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आज पुन्हा या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या परीक्षेत मुलांना प्रश्नपत्रिका झेरॉक्स दिल्याने हा पेपर फुटल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर बहिष्कार घालत परीक्षा दिली नाही. यावेळी त्यांनी सरकार विरोधी घोषणा बाजी देखील केली. बार्टी, सारथी, महाज्योति प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देखील देण्यात आल्या.