Maharashtra Assembly Elections 2024 : पवार कुटुंबात फूट पाडल्याच्या अजित पवार यांच्या आरोपांवर शरद पवार यांनी आज सविस्तर आणि सडेतोड उत्तर दिलं. घर फोडण्याचं पाप माझ्या हातून कधी होणार नाही. माझ्या आई-वडिलांनी आणि माझ्या भावांनी मला ते कधी शिकवलं नाही,' असं शरद पवार म्हणाले.
बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी आज प्रचाराला सुरुवात केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत कन्हेरी येथील हनुमान मंदिरात ही सभा झाली. यावेळी शरद पवार यांनी जबरदस्त भाषण केलं.
शरद पवारांनीच युगेंद्र पवारांना निवडणुकीचा अर्ज भरायला सांगितला असं सांगून त्यांनी घरात फूट पाडल्याचा अप्रत्यक्ष आरोप अजित पवार यांनी सोमवारी केला होता. त्या आरोपाला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं.
'मी घर फोडल्याचं आता सांगण्यात येतंय ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. घर मी कशासाठी फोडेन? मी पवार कुटुंबातला वडीलधारा आहे. आजपर्यंत सगळे माझं ऐकत होते. मी कुणाच्या मनाविरुद्ध काही करत नव्हतो आणि करणारही नाही. इथून पुढंही कुणी चुकीची भूमिका घेतली तरी मी चुकीच्या रस्त्यानं जाणार नाही. कुटुंब एक राहील याची काळजी मी घेईन, तो माझा स्वभाव आहे, असं शरद पवार म्हणाले.
'माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती. बऱ्याचदा होती. अनेक पदं द्यायचे अधिकार होते. अनेकांना मंत्री केलं. उपमुख्यमंत्री केलं. अनेक पदं दिली. एक पद सुप्रियाला दिलं का? कधीच दिलं नाही. बाकीच्यांना दिली. स्वत:च्या मुलीला दिलं नाही. तिनंही कधी मागितलं नाही. आजही त्याच पद्धतीनं काम करतोय. हे करताना घर एकत्र राहिलं पाहिजे हाच विचार मनात होता, असं शरद पवार म्हणाले.
‘गेल्या २० वर्षांत छत्रपती साखर कारखाना, माळेगाव साखर कारखाना, सोमेश्वर कारखाना, दूध संघ, खरेदी-विक्री संघ या कुठल्याही संस्थेत मी एक माणूस निवडला नाही. कुणाला नेमायचं याची साधी चर्चाही केली नाही. सगळे अधिकार देऊन टाकले. माझं लक्ष फक्त शिक्षण आणि शेतीकडं होतं. हे सगळं असताना अशी परिस्थिती का आली?,’ असा प्रश्न शरद पवार यांनी केला.
'घर फोडायचं पाप माझ्या हातून कधीच होणार नाही. ते माझ्या आई-वडिलांनी किंवा भावांनी मला कधी शिकवलं नाही. अनंतरावांच्यासह माझे सगळे भाऊ माझ्यावर प्रचंड प्रेम करायचे. मी कधी घरदार, संसार बघितला नाही. शेती बघितली नाही. सगळी ह्यांनी बघितली. मी गावभर हिंडत बसलो. राजकारण करत बसलो. देशाच्या पातळीवर करत बसलो. ह्या सगळ्या भावांचे आशीर्वाद आणि आधार मागे होता म्हणून करू शकलो. त्यामुळे हे भाऊ आणि त्यांच्या मुलाबाळांना माझ्याकडून कधीच अंतर दिलं जाणार नाही, असा शब्द शरद पवार यांनी दिला.
संबंधित बातम्या