Rohit Pawaron Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारगट व शरद पवार गटात बारामती लोकसभा मतदारसंघात वाद दिवसेंदिवस टोकदार बनत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत त्यांच्या विरोधात आपल्या पक्षाचा उमेदवार देण्याची घोषणाच त्यांनी अप्रत्यक्षपणे केली आहे.
बारामतीमधून आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून गेला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. कोणी भावनिक साद घातली तरी तुम्ही लक्षात घ्या की, भावनिक होऊन पोट भरत नसतं.
बारामतीतून सुप्रिया सुळे यांना कोणत्याही परिस्थितीत पाडण्यासाठी अजित पवार गटाकडून ताकद लावली जात आहे. अजित पवार गटाकडून अत्यंत आक्रमकपणे बारामती लोकसभा मतदारसंघांत प्रचार करत असताना आता आमदार रोहित पवार हे सुद्धा बारामतीच्या मैदानात उतरले आहेत. रोहित पवार यांनी अजित पवार गटाचा उल्लेख मलिदा गँग असा करत जोरदार टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मिडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा_गँग करतेय.. आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँग नेही लक्षात ठेवावं!