Baramati Vidhansabha matdar sangh news : राज्यात बारामती मतदार संघाची निवणूक लक्ष्यवेधी ठरणार आहे. या मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष्य लागून आहे. या ठिकाणी काका पुतण्या अशी लढत असून युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना या ठिकाणी रंगला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री प्रचार संपल्यावर रात्री १० च्या सुमारास युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या कार शोरूमची पोलिसांनी झडती घेतली. मात्र, या ठिकाणी पोलिसांना काहीही मिळाले नसल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना देखील बारामती टेक्स्टस्टाईलमध्ये जाण्यापासून रोखलं होतं. यामुळे देखील वादंग निर्माण झालं होतं.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानसाठी काही तास उरले आहे. उद्या बुधवारी एकाच टप्प्यात राज्यात मतदान पार पडणार आहे. प्रचारसंपल्यावर आता अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामतीत कुरघोडीच राजकारण सुरू असल्याचं काल घडलेल्या घटनेवरून उघड झालं आहे.
सोमवारी शरद पवार यांच्या सांगता प्रचार सभेला बारामती करांनी मोठा प्रतिसाद दिला. दरम्यान, यानंतर रात्री १० च्या सुमारास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू मोटर्स शोरुमची झडती पोलिसांनी घेतली. या ठिकाणी पोलिसांनी तपास मोहीम हाती घेतली. दरम्यान, युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार यांनी पोलिसांना सहकार्य करत झडती घेऊ दिली. या तपासणीत पोलिसांना काही सापडलं नसल्याची चर्चा आहे. मात्र, ही तपासणी अचानक का करण्यात आली या बाबत माहिती मिळू शकली नाही.
पोलिसांनी घेतलेल्या तपासाबाबत युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमवारी रात्री १० वाजता शो रुममधून पोलिस आल्याची माहिती मिळाली. यावेळी आम्ही पोलिसांच्या पथकाला सहकार्य करा असे कर्मचाऱ्यांना सांगत तपासणी करू दिली. आम्ही काहीच चुकीचं केलं नसल्याने पोलिसांना त्या ठिकाणी काही सापडलं नाही. काल शरद पवार यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून समोरील बिथरले आहे. हे या पातळीवर जर राजकारण होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले.
दरम्यान, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी या बाबत माहिती देतांना म्हटलं की, यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आम्ही या शोरूममध्ये सर्च ऑपरेशन राबवले. या परिसरात कुठल्याही प्रकारची रक्कम मिळून आली नाही.
शरद पवार यांच्या पासून फारकत घेत लोकसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यात काका पुतण्या अशी लढत असून या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवार कुटुंबात एकटे असल्याचं दिसत आहे. अजित व आणि त्यांचे कुटुंबीय वगळता इतर सर्व नातेवाईक शरद पवारांसोबत असल्याचे चित्र आहे.