Supriya Sule meets Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी पोहोचल्या आहेत. सुप्रिया सुळे यांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातही मतदान सुरू आहे. इथं पवार कुटुंबातीलच दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. आज दोन्ही उमेदवारांनी आपापल्या बूथवर जाऊन मतदान केलं.
मतदानानंतर सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या काटेवाडीतील घरी पोहोचल्या. अजित पवारही त्यावेळी घरीच उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांंची भेट पूर्वनियोजित होती की अचानक त्यांनी भेट दिली हे कळू शकलेलं नाही. मात्र, त्यामुळं मतदारांमध्ये व राजकीय जाणकारांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत.
बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना असला तरी सुप्रिया सुळे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वैयक्तिक टीका करणं टाळलं आहे. त्यांनी आपल्या प्रचाराचा भर विकासकामांवरच ठेवला होता. मागच्या दहा वर्षांत केलेली कामं आणि भविष्यात करणारी कामं यावरच त्या बोलत होत्या. अजित पवारांनी अनेकदा कौटुंबिक वादावर जाहीर भाष्य केलं. मात्र, त्यालाही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं नाही. आता त्या अजित पवारांच्या घरी गेल्यानं चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी साहजिकच त्यांना अचानक दिलेल्या या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, हे माझ्या काका-काकींचं घर आहे. मी आशा काकींना नमस्कार करण्यासाठी आले होते. घरात फक्त मी आणि काकीच होते. मी फक्त काकींची भेट घेतली. माझं बालपण याच घरात गेलंय. मी या घरात दोन- दोन महिने राहिलेय. माझ्या सर्वच काकींनी माझ्यासाठी बरंच काही केलंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पवार कुटुंबातीलच दोन व्यक्ती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यानं मतदारांमध्ये आधीपासूनच संभ्रम आहे. तो संभ्रम सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या आजच्या भेटीनं वाढण्याची शक्यता आहे. मतदारांवर या सगळ्याचा परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे. जाणकारांच्या मते, राजकीय जीवनात अशा भेटीगाठी होत असतात. मतदारांवर त्याचा परिणाम होत नसतो. मतदारांची मतं आधीच ठरलेली असतात.