Baramati loksabha : बारामतीवर गेल्या काही दशकापासून पवार यांची सत्ता राहिली आहे. पवार म्हणजे बारामती असे समीकरण आता पर्यंत होते. मात्र, अजित पवार यांनी बंड केल्यावर काका पुतण्या एकमेकांसमोर उभे आहेत. त्यामुळे आत बारामतीत लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कोण उभे राहणार याची चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे चिन्ह आहे. दोघीही मतदार संघ पिंजून काढत असून मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.
पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघ आता अजित पवार यांची धाकटी बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोणाचेही नाव न घेता ते देतील त्या मतदाराला मते देऊन निवडून देण्याची भावनिक साद घातली होती. यामुळे ते त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुनेत्रा पवार या देखील मतदार संघात मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. या सोबतच सुनेत्रा पवार यांच्या कामाची माहिती देणारे चित्र रथ देखील मतदार संघात फिरवले जात आहे. हा रथ संपूर्ण लोकसभा मतदारसंघात फिरणार आहे.
सध्या सुप्रिया सुळे बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या आधी त्यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे १९९६ ते २००४ पर्यंत सातत्याने खासदार राहिले आहेत. सुप्रिया सुळे २००९ पासून इथल्या खासदार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस असे जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी बारामतीत सभा घेत यापूर्वी कधीही निवडणूक न लढवलेल्या उमेदवाराला मी उमेदवारी देणार आहे, परंतु ती व्यक्ती पुरेसा अनुभव असलेल्या लोकांमध्ये असली पाहिजे. पवार म्हणाले की, लोकांनी ते स्वत: निवडणूक लढवत आहेत अशा प्रकारे मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.
अजित पवार यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, ""पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने तुम्ही मतदारांना न डगमगता सांगावे की, गेल्या तीन-चार वेळा तुम्ही ज्याला निवडून देत आहात, त्याहून अधिक विकासकामे येथून निवडून आलेला नवा उमेदवार करेल. मतदारांना सांगा की, हे अजित पवारांचे वचन आहे.
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या आहेत. असे असले तरी त्या सामाजिक कार्यातून कायम सक्रिय राहिल्या आहेत. त्या मुळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील असून पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. सुनेत्रा पवार या एन्व्हायरमेंटल फॉर्म ऑफ इंडिया, हायटेक टेक्स्टाईल पार्क कापड उद्योगांशी अनेक संस्था जोडल्या आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबातील महिलांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. ग्राम स्वच्छता, स्मार्ट व्हिलेज, पर्यावरण संतुलित गाव या माध्यमातून सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठात त्या सिनेट सदस्य आहेत. विद्या प्रतिष्ठान संस्थेवर विश्वस्त आहेत. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याने २०१९ ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली होती, मात्र या निवडणुकीत पार्थ पवारचा पराभव झाला होता.
गेल्या वर्षभरात पवार कुटुंबात काका पुतण्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सभेत अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता म्हटले की, ते ज्येष्ठ नेत्याचे (शरद पवार) पुत्र असते तर ते सहज पक्ष प्रमुख झाले असते.
संबंधित बातम्या