Supriya Sule Slams Sunetra Pawar: आगामी लोकसभा निवडणुकीत जेष्ठ नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार एकमेकांविरोधात उभ्या ठाकण्याची शक्यता आहे. यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात अतीतटीची लढत पाहायला मिळू शकते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांना आव्हाने- प्रतिआव्हानेही दिले जात आहेत. नुकतेच बारामतीतील आमराई परिसरात सुनेत्रा पवार यांचा भावी खासदार बॅनर झळकले. याच पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना टोला लगावला आहे. नवऱ्यानं पेपर लिहायचा आणि मी पास व्हायचं असं करणार नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी रविवारी पुण्यात महिलांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मी तुमची लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही म्हणाल तेच मला करायचे आहे. महागाई, बेरोजगाई अशा प्रश्नांवर बोलले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा. तुमच्या सुखदुखात कोण असेल, अशाच लोकांना मतदान करा. मी जी मते मागतेय ती मेरिटवर मागतेय. सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाही. गाव-वाडी-वस्तीवर मी फिरत आहे. माझी खासदारकी ही माझी आहे. यात माझ्या नवऱ्याने लुडबूड करण्याची गरज नाही. माझं आणि सदानंद यांचे तुमच्यासारखेच आहे. त्यांनी मुंबईतले बघायचे आणि मी इथले बघायचे. अशा लोकांना मतदान करा, जो स्वत: सभागृहात उभा राहील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"मी २००९ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले. पण त्याआधी २ वर्ष मतदार संघात फिरले. मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. मी लोकप्रतिनिधी आहे. कॉपी करून पास होणार नाही. नवऱ्याने पेपर लिहायचा आणि मी पास व्हायचे असे करणार नाही. मी सुप्रिया सुळे आहे, स्वतः लिहेन आणि पास होईन, स्वतःच्या मेहनतीने", अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला.
संबंधित बातम्या