Bandra Terminusstampede : मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील २ जणांची प्रकृती गंभीर आहे. यूपीतील गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशी चढण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर सह निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घातली आहे.
प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी हा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. दिवाळी आणि छठपूजे दरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील बंदी ८ नोव्हेंबरपर्यंत तात्काळ लागू होणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी झालेल्या झटापटीनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ जण जखमी झाले आहेत. आगामी दिवाळी आणि छठ सणासाठी आपापल्या घरी परतण्यासाठी वांद्रे टर्मिनलवर मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. अनारक्षित गाडी प्लॅटफॉर्मवर आणली जात असताना अनेक प्रवाशांनी त्यात चढण्यासाठी धाव घेतली. २२९२१ वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी वांद्रे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर मोठ्या संख्येने लोक असताना ही घटना घडली.
वांद्रे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर अंत्योदय एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनल पहाटे पाच वाजता यार्डातून प्लॅटफॉर्मच्या दिशेने हळूहळू जात असताना ही घटना घडली, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. यावेळी प्लॅटफॉर्मवरील काही प्रवाशांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अपघातात दोन प्रवासी खाली पडून जखमी झाले. ड्युटीवर असलेल्या आरपीएफ, जीआरपी आणि होमगार्डच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत जखमी प्रवाशांना जवळच्या भाभा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान,या वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेने प्रवास करण्यासाठी गर्दी केलेले बहुतांश प्रवाशी हे छट पुजेसाठी उत्तर प्रदेशात आपल्या गावी जात होते,अशी प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.