वांद्रे रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस गाडीमध्ये चढताना प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या दुर्घटनेतील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात घटनास्थळी तैनात असलेल्या एका होमगार्डने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.
समाधान धनगर असे प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या होमगार्डचे नाव आहे, जे तीन वर्षांपूर्वी होमगार्ड म्हणून नोकरी करत आहेत. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये समाधान एका प्रवाशाला आपल्या खांद्यावर ठेवून रेल्वेच्या रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे ९ प्रवाशांना वेळेत उपचार मिळाले. समाधान धांगार यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
समाधान धांगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मी रात्रीच्या शिफ्टवर होतो आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मला चार अन्य होमगार्ड्ससह वांद्रे टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म १ वर तैनात करण्यात आले. दरदिवशीप्रमाणे प्रवाशांनी वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी रांगा लावल्या. परंतु, रविवारी सकाळी वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म १ वर पोहोचताच प्रवाशांनी रांग तोडली आणि दरवाज्यांकडे धाव घेतली. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण गर्दीवर नियंत्रण ठेवता आले नाही. मी आठ जणांच्या खाली अडकलो. पण कसातरी गर्दीतून बाहेर आलो. त्यावेळी काही माणसे खाली पडताना दिसली, जे आपत्कालीन खिडकीतून ट्रेनमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना एक-एक करुन उचलले आणि माझ्या खांद्यावर ठेवून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले, जेणेकरून त्यांना आवश्यक उपचार मिळावेत.' रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, धनगर यांनी एकूण ९ जखमींना वाचवले.
वांद्रे-कुर्ला टर्मिनस येथे रविवारी सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुंबईतील रेल्वे टर्मिनसवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रेल्वेने मुंबईतील निवडक प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध ८ नोव्हेंबरपर्यंत लागू राहील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. विनातिकीट प्रवाशांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी स्थानकांच्या प्रवेशद्वारावरील तिकीट तपासनीस दक्षता वाढवणार आहेत. रेल्वेने अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू केले असून कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, रविवारच्या दुर्घटनेचा तपास करत असलेले शासकीय रेल्वे पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. चेंगराचेंगरी कशी आणि कोठून सुरू झाली? हे जाणून घेत आहेत. घटनास्थळी निष्काळजीपणा झाला आहे का? याचाही तपास केला जात आहे.
संबंधित बातम्या