एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येताच प्रवाशांची उडाली झुंबड, बंद होती दारे; वांद्रे रेल्वे स्टेशनमध्ये कशी झाली चेंगराचेंगरी?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येताच प्रवाशांची उडाली झुंबड, बंद होती दारे; वांद्रे रेल्वे स्टेशनमध्ये कशी झाली चेंगराचेंगरी?

एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येताच प्रवाशांची उडाली झुंबड, बंद होती दारे; वांद्रे रेल्वे स्टेशनमध्ये कशी झाली चेंगराचेंगरी?

Updated Oct 27, 2024 05:54 PM IST

Bandra Station Stampede : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती बिघडली. गाडी नुकतीच यार्डातून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली होती आणि डब्यांचे दरवाजे आतून बंद होते.

वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरी
वांद्रे स्थानकात चेंगराचेंगरी (PTI)

Bandra railway station stampede : गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात रविवारी सकाळी चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी दिवाळी आणि छठ पूजा सणासाठी आपापल्या घरी परतण्यासाठी वांद्रे टर्मिनलवर मोठ्या संख्येने प्रवासी जमले होते. अनारक्षित गाडी प्लॅटफॉर्मवर आणली जात असताना अनेक प्रवाशांनी त्यात चढण्यासाठी धाव घेतली व चेंगराचेंगरी झाली. 

ही घटना रविवारी पहाटे पाच वाजून ५६ मिनिटांनी घडली, अशी माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. २२९२१ वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी वांद्रे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. दिवाळी आणि छठ सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल क्लासच्या सर्व २२ डब्यांची रिकामी अंत्योदय एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणली जात होती.

ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात अनेक प्रवासी जमिनीवर पडले -

ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती बिघडली. गाडी नुकतीच यार्डातून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली होती आणि डब्यांचे दरवाजे आतून बंद होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात काही जण प्लॅटफॉर्मवर पडले. सुरुवातीला बोगी किंवा २ डब्यांच्या मधल्या जागेवर आदळून लोक प्लॅटफॉर्मवर पडल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबल्यानंतर डब्यांचे दरवाजे उघडले जातात आणि प्रवासी ट्रेनमध्ये चढतात.

शब्बीर अब्दुल रेहमान (वय ४०), परमेश्वर सुखदार गुप्ता (वय २८), रवींद्र हरिहर चुमा (वय ३०), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (वय २९), संजय तिलकराम कांगे (वय २७), दिव्यांशू योगेंद्र यादव (वय १८), मोहम्मद शरीफ शेख (वय २५), इंद्रजित सहानी (वय १९) आणि नूर मोहम्मद शेख (वय १८) अशी त्यांची नावे आहेत, अशी जखमींची नावे आहेत.

दोघांची  प्रकृती चिंताजनक  -

 रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि स्थानिकांनी जखमींना भाभा रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी इंद्रजीत साहनी आणि नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. या घटनेनंतर अंत्योदय एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनलवरून नियोजित वेळेतच पुढील प्रवासासाठी निघाली.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर