Mumbai Crime news : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने तब्बल २५ महिलांना विविध सीमकार्डवरून अश्लील व्हिडिओ पाठवल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी एका महिलेने तक्रार दिली होती. तेव्हा पासून पोलिस या आरोपीच्या मागावर होते. तब्बल दोन महिन्यांनी हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
मोहम्मद शेख (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. त्याने या साठी वेगवेगळ्या सिमकार्डसह ८ फोन वापरले, असे पोलिसांनी सांगितले. मुंबईत गेल्या काही महिन्यांत किमान २५ महिलांना अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवल्या. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेले १४ जून रोजी तिच्या व्हॉट्सॲपवर पॉर्न क्लिप आल्यानंतर निर्मल नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी क्लिप पाठवण्यासाठी वेगवेगळ्या सिमकार्डसह किमान आठ मोबाईल फोन वापरले होते. पोलिस त्याच्या मागावर असल्याचे कळल्यावर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
निर्मल नगर पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "शेखने अद्याप महिलांचे संपर्क क्रमांक कसे मिळवले ही सांगितलेले नाही. झोन आठचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी ही घटना गांभीर्याने घेतली आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकाची स्थापना केली. यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमंत शिंदे, निरीक्षक अब्दुल रौफ आणि इतर कर्मचारी होते. या पथकाने तांत्रिक सहाय्याने आरोपींचा यशस्वीपणे शोध घेतला.
आरोपी हा विवाहीत आहे. त्याला दोन मुले आहेत. मुंबईतील बेहरामपाडा परिसरात आरोपी भाड्याच्या घरात त्याच्या काही मित्रांसोबत राहतो. आरोपीने गुन्ह्यांसाठी आठ विविध मोबाईलचा वापर केला. आरोपी कमी शिकलेला असला, तरी त्याला मोबाईलमधील तंत्रज्ञानाची माहिती होती. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना दोन महिन्यांचा कालावधी लागला. आरोपीने गेल्या महिन्यात पत्नी आणि मुलावर ॲसिड हल्ला केल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी पिडीत महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. सध्या आरोपीला पोलिस कोठडी देण्यात आली आहे.