मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bandh : पुणे चिडीचूप! सर्व दुकानं बंद, शिवप्रेमी संघटनांनी फडकवले राज्यपालांच्या निषेधाचे बॅनर

Pune Bandh : पुणे चिडीचूप! सर्व दुकानं बंद, शिवप्रेमी संघटनांनी फडकवले राज्यपालांच्या निषेधाचे बॅनर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 13, 2022 09:59 AM IST

Pune City Bandh 13 December : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात मविआकडून बंद पुकारण्यात आला आहे.

Pune City Bandh 13 December
Pune City Bandh 13 December (HT)

Pune City Bandh 13 December : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी पुण्यात बंद पुकारला आहे. त्यामुळं आज शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी प्रशासनानं पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. पुणेकरांनीही मविआनं पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद दिला असून अनेक भागांतील दुकानं लोकांनी स्वत:हूनच बंद ठेवली आहेत. तर दुसरीकडे पुण्यातील नेहमीच्या वर्दळीचा भाग समजल्या जाणाऱ्या अलका टॉकीज चौकात राज्यपाल कोश्यारी आणि भाजपविरोधात बॅनरबाजी करत वक्तव्यांचा निषेध करत नेत्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

मविआ आणि विविध सामाजिक संघटनांनी बंद पुकारल्यानंतर आता पुण्यातील एफसी रोड, जंगली महाराज रोड, लक्ष्मी रोड, विद्यापीठ चौक, डेक्कन आणि अलका टॉकीज चौकात बंद पाळण्यात येत आहेत. दुकानं बंद असल्यानं वाहतुकही मंदावली आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनानं शहरातील चौकाचौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मूक मोर्चामुळं शहरातील वाहतुकीत बदल...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांकडून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली असून टिळक चौक, लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, जिजामाता चौकामार्गे मोर्चा लाल महल परिसरात येणार आहे. त्यामुळं प्रशासनानं शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे.

WhatsApp channel