Pune Lohagav News : सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. अनेक क्रिकेट प्रेमी ही सामने पाहण्यासोबत क्रिकेट खेळत देखील असतात. मात्र, पुण्यात लोहगाव येथे क्रिकेट खेळणे एका ११ वर्षांच्या कुस्तीपटूच्या जिवावर बेतले आहे. क्रिकेट खेळतांना गुप्तांगाला बॉल लागल्याने एका ११ वर्षीय कुस्तीपटूचा मृत्यू झाला. ही घटना लोहगावमधील जगद्गुरू पोर्ट्स अकॅडमी मैदानात गुरुवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली.
शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११ रा. लोहगाव, पुणे) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. या घटनेचे वृत्त असे की, शौर्य उर्फ शंभू हा सहावीमध्ये शिकतो. सध्या शौर्यच्या शाळेला सुट्या लागल्या होत्या. यामुळे तो गुरुवारी (दि २) सायंकाळी आपल्या घरातील इतर मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता. शौर्यला खेळताना अचानक वेगाने पुढून येणारा चेंडू त्याच्या गुप्तांगावर लागला. त्यावेळी तो मैदानच खाली कोसळला.
काही वेळाने तो उभा राहिला. मात्र, त्याला खूप वेदना होत होत्या. या वेदना असह्य झाल्याने तो पुन्हा खाली कोसळला. त्यामुळे इतर मुले गोंधळून गेली. त्या मुलांनी आरडाओरडा केल्याने जवळच्या नागरिकांनी शौर्यला दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
शंभूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल असे पोलिसांनी सांगितले. शंभूच्या अचानक मृत्यूमुळे खांदवे कुटुंबीयांसह लोहगाव व परिसरात शोककळा पसरली आहे. शंभू हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे यांचा पुतण्या होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.