Buldhana Baldness Virus : जगात सध्या एचएमपीव्ही आजारामुळे टेंशन वाढलं असतांना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरातील गावांत मात्र, एक वेगळाच भयंकर आजार पसरला आहे. या आजरामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तुम्ही हा आजार ऐकून चक्रावून जाल. येथील नागरिकांच्या डोक्याला खाज येऊन त्यानंतर तीन दिवसांत त्यांचं टक्कल पडत आहे. या आजाराची दखल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतली असून गावात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदी जवळील बोंडगाव, कालव आणि हिंगणा या गावांमध्ये अनेकांना अज्ञात आजाराने ग्रासले आहे. येथील ग्रामस्थांच्या डोक्याला अचानक खाज सुरू होते. यानंतर केसगळती होऊन तीन दिवसांत टक्कल पडत आहे. या आजाराचा धसका परिसरातील सर्व नागरिकांनी घेतला आहे. बोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कालवड येथे १३ नागरिकांना तर कठोरा येथील ७ नागरिकांना हा आजार झाला असून त्यांना पूर्ण टक्कल पडलं आहे. त्यामुळे हा आजार नेमका काय आहे ? या बाबत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षण केलं जात आहे. या गावात आरोग्य पथक दाखल झाले असून नागरिकांची विचारपूस करून त्यांची हिस्ट्री घेतली जात आहे.
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, हिंगणा आणि भोटा गावात हे आरोग्य पथक सर्वेक्षण करत आहे. या आजाराबाबत आरोग्य विभागाने परिपत्रक काढले असून काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. आरोग्य विभागाच्या पत्रात६ जानेवारी पासून काही गावात सर्वेक्षण केलं जात असून यातील कालवड गावात १३ केस गळतीचे तर कठोरा येथे ७ रुग्ण आढळल्याचे म्हटलं आहे. हे सर्व रुग्ण बोरवेलच्या पाण्याने आंघोळ करत असल्याचे व इतर कामासाठी पाणी वापरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे केस गळतीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
संबंधित बातम्या