मुंबई : कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या गेल्या काही दिवसातील भूमिकेमुळे त्यांचे पक्षातील गटनेतेपण धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यांनी पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीतही त्यांची कामगिरी योग्य नसल्याने पक्ष प्रमुखांची नाराजी त्यांच्यावर आहे. पुण्यातील पोटनिवडणूक झाल्यावर थोरात यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पद अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या लेटर बॉम्ब मुळे पक्षातील नाराजी पुन्हा उघड झाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या सोबत काम करणे अशक्य असल्याचे पत्रात नमूद केलए होते. या सोबत अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचाही थोरात यांनी आरोप केला आहे. दरम्यान, सत्यजित तांबे यांनी देखील नाना पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पत्रामुळे कॉँग्रेसमधील नाराजी उघड झाल्याने आता पक्ष प्रमुख काय भूमिका घेतात या कडे लक्ष लागून आहे. दरम्यान, विधिमंडळातील गटनेतेपदासाठी इच्छुक काही ज्येष्ठ काँग्रेस नेते पटोलेंशी असलेले मतभेद विसरून थोरात यांच्यावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत.
नुकत्याच झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यात त्यांनी पक्षाचा आदेश डावलल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्व प्रकरणात बाळासाहेब थोरात यांनी योग्य भूमिका घेतली नाही. तसेच थोरात यांनी निवडणुकीत निष्क्रिय राहून त्यांनी तांबे यांना मदत केली असा आरोप थोरात यांच्यावर करण्यात येत आहे. त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधात असे दोन गट निर्माण झाल्याने आता त्यांच्या गट प्रमुख पदावर संकट येण्याची शक्यता आहे.