मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “पुन्हा बजावतो, महाराष्ट्रासह देशाला आपली गरज, त्यामुळे..” बाळासाहेब ठाकरेंनी पवारांना लिहिलेलं पत्र आलं समोर

“पुन्हा बजावतो, महाराष्ट्रासह देशाला आपली गरज, त्यामुळे..” बाळासाहेब ठाकरेंनी पवारांना लिहिलेलं पत्र आलं समोर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 02, 2024 04:20 PM IST

Balasaheb Thackeray Letter to Sharad Pawar : जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवार अजारी असताना लिहिलेलं पत्र पोस्ट केलं आहे. त्यात ते म्हणत आहेत की, महाराष्ट्रासह देशाला आपली गरज आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी पवारांना लिहिलेलं पत्र आलं समोर
बाळासाहेब ठाकरेंनी पवारांना लिहिलेलं पत्र आलं समोर

Balasaheb Thackeray letter to Shard pawar : दिवंगत नेते व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray ) व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) राजकारणात एकमेकांचे कायम विरोधक राहिले. मात्र त्यांची मैत्री राजकारणा पलिकडची होती.दोघांमध्ये वैयक्तिक आयुष्यात व कौटुंबिक पातळीवर कमालीचे जिव्हाळ्याचे संबंध होते. जाहीर सभांमधून एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या या नेत्यांच्या मनात द्वेष भावना नव्हती. २००६ मध्ये शरद पवार कॅन्सरची झुंज देत असताना बाळासाहेबांनी आपुलकीने चौकशी करणारं व प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन करणारं एक पत्र पवारांना लिहिलं होतं. ते पत्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे, असं बाळासाहेबांनी पवार यांना म्हटलं आहे. हे पत्र शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे.

बाळासाहेबांनी शरद पवारांना लिहिलेलं पत्र-

बाळासाहेबांनी सुरुवातीला म्हटले की, प्रिय शरदबाबू यांसी जय महाराष्ट्र!
 

आपण केंद्र शासनात कृषिमंत्री या पदावर विराजमान आहात. तरीपण हे पद बाजूला सारून आपल्याला मी माझे जुने मित्र शरदबाबू या नावानेच विचारणार आणि बोलणार. आपण बरे झालात हे ऐकून बरे वाटलेः परंतु वडीलधाऱ्या अधिकाराने आम्ही आपल्याला आदेश देत आहोत की, यापुढे जरा वणवण कमी करा. झेपेल तेवढे जरूर करा! पण अलीकडे आपला दौऱ्यावर जाण्याचा सुकाळ झाला होता. वाकड्यातिकड्या मार्गाने आपण दौरे करीत होता, परदेश दौऱ्यांतही कोठे कमतरता नव्हती, आपल्या पक्षाची निशाणी जरी घड्याळ असली तरी आणि त्या घड्याळाचे काटे जरी स्थिरावले असले तरी आपल्या आयुष्याचे घड्याळ टिक टिक करीत त्याचे काटे पुढे सरकतच असतात हे विसरू नये.

सोनियाच्या'कथली' राजवटीत आपण अन्न व शेती मंत्री आहात. सध्याच्या परिस्थितीत हे महत्त्वाचे खाते आपण सांभाळीत आहात. त्यामुळे फक्त महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे. त्यामुळे स्वतःसाठी नसले तरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तुम्हाला जगावेच लागेल. त्याप्रमाणे वागणूक ठेवावी व प्रकृतीची काळजी घ्यावी."

IPL_Entry_Point