Shiv Sena UBT Melava 2025: ‘मराठी माणसाच्या नादी लागू नका, जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे’, अशा शब्दांत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
‘गद्दारांनी वार केले तरी, उद्धव ठाकरे संपणार नाही. त्यांना गाडूनच मी संपेल. ज्या दिवशी एखादा निष्ठावंत शिवसैनिक मला बोलेल, तेव्हा मी लगेच पक्षप्रमुखाचे पद सोडेल. महाराष्ट्रातील लोक मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात, तो महाराष्ट्र आणि मुंबईकर माझ्या जीवाला जीवच देईन’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणारा आहे, असे अमित शाह यांनी म्हटले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘वाघ काय असतो आणि पंजा काय असतो? ते येत्या काळात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका, जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आमित शाह जागा ठरवू शकत नाही. हारजीत होत असते. पराभव आम्हाला धक्का देणारा होता. पण भाजपच्या अनेक नेत्यांना धक्का देणारा ठरला. कारण आपण कसे जिंकलो, हेच त्यांना समजले नाही. अडीच वर्ष सर्व सत्ता वापरून अमित शाहने आपल्यावर घटनाबाह्य सरकार बसवले. आपल्या हातातून महाराष्ट्र जाऊ देतील? ज्या क्षणी महाराष्ट्र हातून जाईल तेव्हा दिल्ली कोलमडेल, हे त्यांना माहीत होते. जर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला निकाल लागला असता तर दिल्ली त्यांच्या हातून गेला असता.’
‘मी त्यांना सोडणार नाही, त्यांचा समाचार घेत राहणार. त्यांनी मिठी मारली तर, आम्हीही प्रेमाने मिठी मारू, पण पाठीत वार केला तर वाघनखे काढू. हा महाराष्ट्र आहे. ही महाराष्ट्राची शिकवण आहे’, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी आमित शाह यांना दिला.
संबंधित बातम्या