Badlapur Sexual Assault Case : आज संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात वउत्साहात साजरा केला जातआहे. मात्र बदलापूर शहरात झालेल्या दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर यंदा शहरातील सर्व दहीहंड्याचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बदलापुरातील एका शाळेत झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूर शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी आयोजित केलेले दहीहंडी उत्सव रद्द केले आहेत. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून हा निर्णय घेतला असल्याचे दहीहंडी आयोजकांनी म्हटले आहे.
तसेच बदलापूर साऊंड असोसिएशननेही या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आपल्या आज घेतलेल्या सर्व ऑर्डर्स रद्द करून शहरात कोठेही साऊंड सिस्टीम न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आज सकाळपासूनच संपूर्ण बदलापूर शहरातील दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.
दरवर्षी बदलापूर शहरात विविध राजकीय पक्षाकडून चौकाचौकात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दहीहंडी फोडणाऱ्या मंडळाला लाखोंची बक्षीसे दिली जातात. त्याचबरोबर यंदा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवली जाण्याची शक्यता होती. यामुळे आयोजकांसह गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र दोन आठवड्यापूर्वी बदलापुरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे सामाजिक भान ठेवत राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी उत्सव रद्द केला आहे.
दरम्यान बदलापूर शहरातील सर्वच दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने शहर व परिसरातील गोविंदा पथकांनी मुंबई, ठाण्याच्या दिशेने धाव घेतली आहे. गेल्या महिन्याभरापासून बदलापूरतील विविध गोविंदा पथक दहीहंडीचा सराव करत होते. मात्र आपल्या शहरातील दहीहंडी उत्सव रद्द झाल्यानंतर त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने कूच केली आहे.
बदलापुरातील एका शाळेत ४ वर्षाच्या चिमुकल्यांवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. संतप्त जमावाने २० ऑगस्ट रोजी शाळेवर मोर्चा काढत तोडफोड केली होती. तसेच बदलापूर रेल्वे स्थानावर रुळावर उतरून रेल रोके आंदोलन केले होते. आंदोलकांनी ८ ते १० तास रेल्वे सेवा रोखून धरली होती. याचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत.
या घटनेमुळेच यंदा बदलापूरमध्ये कोठेही दहीहंडीचा उत्सव भरवला जाणार नाही. बदलापूर शहरात काँग्रेस शहर अध्यक्ष संजय जाधव यांच्या माध्यमातून दरवर्षी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची सर्वात मोठी दहीहंडी उभारली जाते. अजय राजा हॉल समोर उभारली जाणारी ही दहीहंडी यंदा रद्द केल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यानंतर शहरातील सर्वच लहान मोठ्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्याचे संबंधित आयोजकांनी जाहीर केलं आहे.