Badlapur Case Girish Mahajan : बदलापूर पूर्वमध्ये एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी शाळेला घेराव घातला तसेच आज सकाळी१०वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरु आहे. बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन करत रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी केली आहे. आंदोलकांचा रुद्रअवतार पाहून पोलिसांचा मोठा ताफा रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आला आहे. मात्र यावेळी आंदोलकांकडून काही प्रमाणात दगडफेकही करण्यात आली. आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी लावून धरली.
आदोलकांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकात दाखल झाले. यावेळी गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक पहयाला मिळाला. गिरीश महाजन यांच्या दिशेने बाटली भिरकावली गेली. तसेच आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
दरम्यान,राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र,आंदोलकांकडून त्यांच्यावर बाटली फेकण्याचा प्रयत्न झाला. बदलापूरमधील जमावाला शांत करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल होताच एका आंदोलक महिलेने या ठिकाणी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही शांत बसला असता का?असा सवाल गिरीश महाजन यांना केला.
यावर गिरीश महाजन म्हणाले की,मुलगी कुणाचीही असो, आरोपीला लोकांच्या ताब्यात देऊन त्याला ठार करावं,असा कायदा आहे का?तुमचा राग योग्य आहे. त्याचा मला राग नागी.आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. तुम्ही आंदोलन मागे घ्या”, अशी विनंती गिरीश महाजन यांनी केली. यावेळीआणखी एक महिला गिरीश महाजन यांच्याजवळ आली. तिने म्हटले की, चिमुरडींसोबत झालेला प्रकार किती भयानक आहे. त्या प्रकाराची आपण कल्पनादेखील करु शकत नाही. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. तसेच आरोपीला लाईव्ह फाशीची शिक्षा देण्यात यावी.
बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान आंदोलकांनी मागणी केली आहे की, घटनास्थळी मुख्यमंत्र्यांनी यावे. त्यांनी आरोपीला फाशी देण्याचे आश्वान द्यावे.
बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांनी रेल रोको आंदोलन केल्यानं मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर-कर्जत रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. बदलापूर स्थानकात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केल्याचे समोर आले आहे. संतप्त पालकांनी शाळेतही तोडफोड केली आहे.