Maha Vikas Aghadi: नामांकित शाळेतील दोन चिमुरडीवर लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या घटनेच्या निषेर्धात महाविकास आघडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली. यात आघाडीचे सगळे पक्ष सहभागी होणार आहेत. नुकतीच महाविकास आघाडीची बैठकी पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बदलापूरची घटना आणि महिला व मुलींवरील वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या नेत्यांनी बदलापूरची घटना आणि एकूणच राज्यातील महिला व मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा केली.
बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षाताई गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते खा. संजय राऊत, माजी मंत्री अस्लम शेख आदी उपस्थित होते.
‘महाराष्ट्रात महिला, बालकांविरोधात होत असलेल्या अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. राज्यातील गृह खात्याचे हे सपशेल अपयश आहे. या निष्क्रिय सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, संघटना या बंदमध्ये सहभागी होतील’, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले.
पुढे जंयत पाटील म्हणाले की, ‘बदलापूरच्या घटनेत गृहखात्याने गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई केली. शाळा संस्थेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच बदलापूरकर चिडले आणि रस्त्यावर आले. यात भाजपा आणि मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही.’
‘महाराष्ट्रातील बालकांविरोधी गुन्हे २०१४ साली आठ हजार होते ते आता २२ हजारांपर्यंत गेले आहेत. महिलांवरील अत्याचार २६ हजारांवरून ५० हजारांपर्यंत पोहोचले आहेत. हे गंभीर आहे. त्यामुळे यात कोणते राजकारण नसून सामान्य जनतेचे प्रश्न आम्ही विरोधक म्हणून मांडणार आहोत’, असेही जंयत पाटील यांनी म्हटले आहे.
या घनटेच्या निषेर्धात संतप्त पालक आणि स्थानिक नागरिकांनी मंगळवारी सकाळी शाळेबाहेर जमून रेल्वे स्थानकावर 'रेल रोको' आंदोलन केले. तसेच काही आंदोलकांनी शाळेचे गेट, खिडक्यांच्या काचा, बेंच आणि दरवाजे तोडून मालमत्तेचे नुकसान केले. आंदोलन आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती डीसीपी सुधाकर पठारे यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा बदलापूर येथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या जवळच्या नातेवाईकाची आहे.
अक्षय शिंदे, असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. त्याने शाळेच्या शौचालयात दोन चिमुकलींवर अत्याचार केला. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली. स्थानिक न्यायालयाने अक्षय शिंदेच्या पोलिस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. गेल्या आठवड्यात ज्या शाळेत ही घटना घडली, त्या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या आरोपीला आज सकाळी कडक पोलिस बंदोबस्तात कल्याण येथील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले, त्यानंतर पोलिसांनी त्याला व्हॅनमधून नेले. पोलिसांनी आरोपीला १७ ऑगस्ट रोजी अटक केली होती.
दगडफेक आणि इतर गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत एकूण ४० जणांना अटक करण्यात आली आहे. इतर गुन्हेगारांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि व्हिडिओ न्यूज क्लिपिंग तपासली जात आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ३२ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपीचे आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली.