Badlapur School Case : बलापूर येथील एका बड्या शाळेत दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेच्या २४ तासांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला कोर्टात हजर केले असता, २५ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत सुनावली आहे. त्याने असे अनेक गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय असून त्याने हे कृत्य कसं केलं याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडी मागीतली असून कोर्टाने ती मान्य केली. विशेष महिला पोक्सो न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा निर्णय दिला आहे
महाराष्ट्रातील ठाण्यातील बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. अत्याचाराच्या या घटनेने संपूर्ण देश हादरला. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणातील कथित निष्क्रियतेबद्दल काही पोलिसांना निलंबित केले आहे. अल्पवयीन मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी मंगळवारी शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले. आंदोलक आरोपी अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी काल बदलापूर येथे मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अत्याचार करण्यात आलेल्या मुलींपैकी एक तीन वर्षांपेक्षा लहान आहे, तर दुसरी सुमारे ४ वर्षांची आहे. या मुलींना न्याय देण्यासाठी मोठे आंदोलन झाले.
मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिल्याने त्यांच्या पालकांनी त्यांची विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. मुलींनी एक दादा माझ्या शू च्या ठिकाणी हात लावत असल्याचं मुलीनं सांगितल्यावर पालकांना मोठा धक्का बसला. शाळेतील सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे यानं त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं समोर आलं.
आरोपी अक्षय शिंदे (वय २४) ह्याला १ ऑगस्ट रोजी मुंबईपासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या एका सफाई कंपनीकडून शाळेने कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवले होते. १४ ऑगस्ट रोजी त्याने शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना ज्या शाळेत घडली ती बदलापूरमधील नामांकित संस्था आहे. शाळेत मराठी आणि इंग्रजी भाषेत शिक्षण दिलं जातं. शाळेतील विद्यार्थी संख्या १२०० च्या आसपास आहे.
पीडित दोघींपैकी एकीने तिच्या आजोबांना तिच्या शू च्या ठिकाणी जळजळ होत असल्याचं सांगितलं. तसेच तिच्या सोबत घडलेला प्रकार देखील तिनं घरी सांगितला. तिच्या दुसऱ्या मैत्रिणीसोबत देखील असाच काही प्रकार घडल्याचं मुलीनं सांगितलं त्यानंतर मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना फोन केला असता दोन्ही मुली शाळेत जाण्यास इच्छुक नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचं पुढं आलं. त्यांनी याची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी देखील तब्बल १२ तास त्यांना ताटकळत ठेवलं. यामुळे पालकांचा संताप झाला. तसेच त्यांनी शाळा प्रशासनावर देखील गंभीर आरोप केले.
एकनाथ शिंदे सरकारने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवन्यात येईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, शाळेने या घटनेबद्दल माफी मागितली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी दिरंगाई केली असेल, तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे देखील सरकारने म्हटले आहे. यापूर्वीही या प्रकरणी काही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी शाळा दोषी आढळल्यास शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.