बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या केली नसून त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याचे समोर आले आहे. अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर केले. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षण करण्यासाठी त्याच्यावर उलट गोळीबार केल्याने अक्षयचा मृत्यू झाला. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मात्र,या घटनेवर अक्षयच्या आई वडिलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. माझ्या मुलाला पैसे देऊन मारून टाकण्यात आलं आहे. त्याला साधा फटाका फोडता येत नाही, तो बंदूक काय चालवणार? असा सवाल करत या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे.
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आईने टाहो फोडला आहे. त्याच्या आई-वडिलांनी पोलिसांवर आरोप केला आहे. त्याच्या आईने म्हटले की, माझा पोरगा फटका फोडू शकत नाही. तो बंदूक काय चालवणार? तो गाड्यांनाही घाबरायचा. आम्ही रोजचं काम करून जगणारे लोकं आहोत. आम्हीही आता जगणार नाही. आमच्या पोरासोबतच जाणार आहोत.
मी आजच त्याची भेट घेतली होती. त्याच्या हातामध्ये कुठले तरी पेपर होते, त्याला लिहून दिलेले. तो दाखवत होता मला. पण आम्हाला लिहियला वाचायला येत नाही. आम्ही शिकलेले नाही.पैसे देऊन मारून टाकलं माझ्या पोराला. त्याला ज्या हॉस्पिटलला ठेवलंय तिथे आम्ही येतो, आम्हालाही गोळ्या घाला. आम्ही पण मरायला तयार आहे.
अक्षयच्या आईने आरोप केला की,माझा पोरगा असं करू शकत नाही. पैसे देऊन माझ्या पोराला मारून टाकलंय. माझं पोरग असं करू शकत नाही. त्याच्यावर खोटा आरोप केला आहे. शाळेत दुसरं कुणीतरीगुन्हा केला आहे. जर माझ्या पोरानं गुन्हा केला असता तर शाळेत कामाला गेला नसता. शाळेतील ६ बायका फरार आहेत, त्यांना का पकडत नाही, असा सवाल अक्षय शिंदेच्या आईने केला आहे.
अक्षय शिंदेची आई म्हणाली की, पोलिसांना मी म्हटले, तुम्ही अक्षय शिंदेला का घेऊन येत नाही. त्यावर पोलीस म्हणाला, 'अक्षय शिंदेला इथं बघितलं तर मारून टाकतील. म्हणून त्याला घेऊन यायला माणसं लागतात. त्याचा रिपोर्ट मोठा आहे. अक्षय मला म्हणत होता, मला कधी सोडवणार?