बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला चकमकीत ठार केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील सहआरोपी असलेले संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना कर्जतमधून अटक केली होती. ४० दिवस फरार असलेल्या दोघांनी ठाणे पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अटक केली होती. आता दोन दिवसातच कोर्टानेत्यांचाजामीन मंजूर केला आहे. तसंच शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही जामीन मंजूर झाला आहे.
मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्यानंतर बदलापूर प्रकरणातील घडामोडींना वेग आला. न्यायालयाने एन्काउंटरबाबत अनेक सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल उपस्थित केले. त्यानंतर कोतवाल व आपटे यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळून लावला. त्यानंतर घटनेच्या दिवसापासून बेपत्ता असलेल्या शाळेच्या संस्थापक आणि सचिवाला अटक करण्यात आली होती. पण दोनच दिवसांमध्ये दोघांनाही जामीन मिळाला आहे.
शाळेचे संचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोघांना कल्याण न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दोघांना दोन प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये गुरुवारीच जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर एसआयटी टीमने दोघांना आज कल्याण न्यायालयात हजर केलं असता कोर्टाने दोघांनाही जामीन मंजूर केला.
बदलापूर प्रकरण समोर आल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापिकेला अटक करण्यात आली होती. अर्चना आठवलेला प्रकरणाची माहिती असून सुद्धा माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले स्वत: न्यायालयात हजर झाल्या होत्या. आज त्यांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणात संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना मंगळवारी कर्जतमधून अटक केली होती. दोघेही गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून फरार होते. शाळेच्या विश्वस्तांना अटक करण्याच्या दिरंगाईवरून कोर्टाने पोलीस आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढत म्हटले होते की, तुम्ही त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची वाट पाहात आहात काय? त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. दोघेही दोघे नेरळच्या दामत गावातील फार्म हाऊसवर होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेल्यानंतर शाळेच्या संचालकांवर कारवाईची मागणी होत होती.