बदलापूर पूर्वमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे ठाणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे बदलापुरात तीव्र पडसाद उमटले असून मंगळवारी आंदोलनाचा आगडोंब उसळला होता. ८ ते १० तास लोकल रोखून धरली होती. या आंदोलनात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या तसेच आंदोलनात सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधला होता. अनेकांच्या हातात या योजनेवर टीका करणारे पोस्टर होते. लाडकी बहीण योजना नको पण महिला आणि मुलींना सुरक्षा द्या,असं काही आंदोलकांनी पोस्टरवर झळकवलं होतं.
यानंतर भाजप व मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आंदोलन राजयकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका केली. लाडकी बहीणवर केलेली टीका सरकारच्या जिव्हारी लागली आहे. आंदोलन पूर्वनियोजित असल्याचा आरोप सरकारकडून केला जात असून आंदोलनात योजनेचे पोस्टर छापून कसे काय आणले, असा सवाल केला जात आहे. त्यातच आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा प्रतिकात्मक चेक देण्याचा प्रयत्न केला. रश्मी शुक्ला (RashmiShukla) यांनी ठाकरे गटाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले मात्र चेक स्वीकारला नाही.
अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी सांगितले की, लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहीण हवी यासाठी आज राज्याच्या पोलीस महासंचालक डॉ रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या सर्व उपनेत्या व युवासेना कार्यकारिणीच्या सदस्या उपस्थित होत्या. राज्याच्या महिला सुरक्षिततेसाठी लाडक्या बहिणीचा प्रतिकात्मक चेक महासंचालक यांना देण्यासाठी आणला मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही. बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व या घटनेत दिरंगाई करणाऱ्या पोलीस,शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस महासंचालक यांना दिले आहे.
राज्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना या सरकार उघड्या डोळ्याने बघत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यास पोलीस दल सपशेल अपयशी ठरलं आहे. त्याचबरोबर महायुती सरकार सर्व पातळ्यांवर फेल ठरले आहे. त्याचबरोबर या घटनेवरून राजकारण सुरू असल्याचा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता उत्तर देण्यास सक्षम आहे,असे म्हणत दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.