Badlapur railway station flatform one will close : बदलापूर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी आत आणखी वाढणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या नव्या पुलाच्या पिलर उभारणीसाठी जागा कमी पडत असल्याने बदलापूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे आता मुंबईला जाण्यासाठी लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना होम प्लॅटफॉर्मवर जाऊन लोकल पकडावी लागणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ बंद झाल्यामुळे आता होम फ्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी होणार आहे. या मुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.
बदलापूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या सोईसाठी नव पूल उभारण्यात येणार आहे. या पूलासाठी पिलर उभारणीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील जागा ही कमी पडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एक नंबर फ्लॅटफॉर्म क्रमांक हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या साठी येथे लोखंडी कुंपण देखील घालण्यात येणार आहे. हा फ्लॅटफॉर्म बंद झाल्याने प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी होम प्लॅटफॉर्मवरुन जाणारी लोकल पकडावी लागणार आहे.
पूर्वी या दोन्ही प्लॅटफॉर्मवरुन लोकल पकडण्याची सोय असल्याने प्रवाशांची गर्दी ही विभागली जात होती. मात्र, आता क्रमांक १ चा प्लॅटफॉर्म बंद करण्यात आल्याने आत होम प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. यामुळे लोकल पकडतांना प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे बदलापूरकर येथील प्रवासी संतप्त झाले आहेत.
या ठिकाणी मुंबई तर कर्जत दिशेने १२ मिटरचा बंदिस्त पुल बांधण्यात येणार आहे. हा पूल आधुनिक असणार आहे. या ठिकाणी तिकीट घर, रेल्वे स्टेशन मास्तरचे कार्यालय, शौचालय, खानपाणाचे स्टॉल, प्रतीक्षागृह आदि सुविधा दिले जाणार आहेत. या ठिकाणी प्रवाशांच्या सोईसाठी सरकता जिना देखील बांधण्यात येणार आहे. हा पूल बांधण्यासाठी मोठे पिलर उभारण्यात येत असून हे पिलर एक व दोन नंबरच्या फलाटावर उभारण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी जागा कमी असल्याने फक्त कर्जतकडे जाणाऱ्या लोकलसाठी दोन नंबरचा फलाट सुरु ठेवण्यात येणार आहे. सध्याचा एक नंबरचा फलाट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.