Badlapur News Today: बदलापुरात शुक्रवारी एका महिलेने पोटच्या मुलाच्या अंगावर मिरची पावडर मिसळलेले उकळते पाणी ओतल्याची घटना घडली. या घटनेत मुलगा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेला तिची सून आवडत नव्हती. तिने अनेकदा मुलाला त्याच्या पत्नीला सोडून देण्यास सांगितले. मात्र, तो पत्नीला सोडायला तयार नव्हता, यामुळे संतापलेल्या महिलेने धक्कादायक पाऊल उचलले. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आपली पत्नी आणि कुटुंबासह बदलापुराच्या साई वालावली गावात राहत होता. परंतु, मुलाच्या आईला तिची सून आवडत नव्हती.घरात जमिनीवरून वाद सुरू असून या सगळ्यासाठी सून जबाबदार असल्याचे आईला वाटत होते. यामुळे तिने आपल्या मुलाला सूनेला सोडून देण्यास सांगितले. परंतु, मुलाने त्याच्या आईला स्पष्ट नकार दिला.
दरम्यान, शुक्रवारी मुलाची पत्नी काही कामानिमित्त बाजारात गेली होती. त्यावेळी आईने मुलाला जेवायला बसायला सांगितले. मुलगा जेवत असताना आईने पुन्हा एकदा त्याला पत्नीला सोडण्यास नकार दिला. मात्र, त्यावेळीही मुलाने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर रागाच्या भरात आईने उकळत्या पाण्यात लाल मिरचीची पावडर टाकून मुलाच्या अंगावर ओतले. त्यानंतर मुलगा मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून शेजारी धावत त्याच्या घरी आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.