Badlapur Minor girls sexual abuse case: बदलापूर येथील एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली. या घटनेच्या निषेर्धात मोठ्या संख्येने संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात येऊन निदर्शने केली. परिणामी, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. अखेर रेल्वे रुळावरुन आंदोलक हटत नसल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याआधी अंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने अशा घटनांना आळा घालण्यासाठी शांळासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केले आहे, ज्याचे पालन करणे सगळ्यांना बंधनकारक असेल, अशी माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
– मुंबईतील प्रत्येक शाळेतील महिला स्वच्छतागृहाजवळ महिला कर्मचारी असणे आवश्यक.
- शाळेत आत्मरक्षाशी निगडीत अभियान सुरू केले जाईल.
- प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्याचे गरजेचे.
- शाळेत महिला पालकांची आणि शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश
- प्रत्येक महिन्याला मुलींच्या आरोग्याची तपासणी केली जाणार.
बदलापूर अत्याचारप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.
बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. याप्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे, विरोधकही सरकारवर टीका करताना दिसत आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली, ती शाळा भाजपशी संबंधित लोक चालवत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. मातोश्री निवासस्थानी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,'देशात अशा घटना घडत आहेत. आपल्या देशातील काही राज्यांमध्ये घटनांचे राजकारण केले जाते. एकीकडे आपल्याकडे 'लाडकी बहिण' योजना सुरू आहे. परंतु, दुसरीकडे बहिणीच्या मुली असुरक्षित आहेत. देशात अशा घटना घडू नयेत. या प्रकरणाची जलद गतीने सुनावणी झाली पाहिजे, पक्षीय मतभेद विसरून एकत्र येऊन अशा घटना टाळायला हव्यात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.