Badlapur protest news : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा आज उद्रेक झाला आहे. सकाळ पासून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. संतप्त आंदोलकांनी शाळेसमोर आणि बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलना दरम्यान, जमावाने शाळेवर, रेल्वेस्थानकावर व पोलिसांवर दगडफेक केली आहे. तसेच रेल रोको आंदोलनावर आंदोलक ठाम आहे. यासोबतच चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देखील नागरिकांनी लावून धरली आहे.
बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिक रेल्वे रुळावर उतरले आहेत. सकाळी १० वाजतापासून हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे गेल्या दोन तासांपासून कल्याण कर्जत मार्गावर लोकलसेवा ठप्प झाली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली असून शहरातील मुख्य रस्त्यावरही टायर पेटवण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याची विनंती केली. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवर आणि रेल्वे स्थानकावर व शाळेवर दगडफेक केली आहे. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन केले आहे. या दगडफेकीत काही पोलिस व काही महिला जखमी झाले असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश दिले असून या प्रकरणी कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बदलापूर येथील घटना दुर्दैवी असून या प्रकरणी आरोपीला २ तासात अटक करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. तर या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, असे असले तरी नागरिक आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाले आहेत. संतापलेल्या पालकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे.
आज सकाळी मोठ्या प्रमाणात आंदोलक हे बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झाले होते. अनेकांच्या हातात फलक होते. आंदोलकांनी रुळावर येत रेल रोको आंदोलन सुरू केले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी अत्याचार प्रकरणातील पीडितांना न्याय देण्याची मागणी करत, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपीला फाशी द्या अशी घोषणाबाजी देखील आंदोलकांनी केली. सुरवातीला आंदोलक पालक हे शाळेच्या पुढे जमले होते. सकाळी साडेसहा वाजता सर्व पालकांनी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर संतप्त झालेल्या आंदोलक पालकांनी थेट बदलापूर रेल्वे स्थानकात जात रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे डाऊन मार्गावरील कोयना एक्सप्रेससह संतप्त आंदोलकांनी रोखून धरली होती.