बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदुक हिसकावून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. मात्र आता नवीन माहिती मिळत आहे की, अक्षय शिंदे याने आत्महत्या केली नसून पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याचा एन्काऊंटर केला आहे.
बदलापूरमधील एका शाळेत तीन ते चार वर्षांच्या चिमुरडींवर बलात्कार करणारा आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याचे वृत्त आहे. अक्षयने पोलिसांची बंदुक हिसकावून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्युरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अक्षयने पोलीस निरीक्षकाची रिवॉल्वर हिसकावून ३ ते ४ राउंड फायरिंग केली. यामध्ये पोलीस निरीक्षक जखमी झाले. स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाला. अशी माहिती, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी दिली आहे.
ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदेंने पोलीस व्हॅनमधील पोलिसाच्या कंबरेवरील बंदूक हिसकावून तीन राऊंड फायर केले. यावेळी दुसऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रत्युरादाखल अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाला व रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काही वेळातच वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात जाणार असल्याची माहिती आहे.
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर राज्यात खळबळ उडाली असून विरोधी नेत्यानंतर पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना बदलापूर प्रकरणातील सरकारी वकील उज्जवल निकम यांनी म्हटले की, आरोपीवरील गोळीबार केल्याची घटनेची चौकशी केली जाईल. याबाबत मला सविस्तर माहिती नाही. माझं पोलीस अधिकाऱ्यासोबत बोलणं झालं नाही. बदलापूर प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानुसार, आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे एसआयटीला उपलब्ध झाले होते. आरोपीला देखील आरोपपत्राची कॉपी मिळाली होती. माझ्या अनुभवानुसार काही आरोपींना आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असतो, त्यातून त्याने हे पाऊल उचललं असावं, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.