Badlapur Case: बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अक्षय शिंदे पोलिस एन्काउंटरमध्ये ठार झाला.आता संबंधित शाळेच्या ट्रस्टींबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळेच्या ट्रस्टींचा मानवी तस्करी, चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल केली असून लवकरच त्यावर सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, बदलापूर अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाली, अशी तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शाळेतून घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज गायब करणारा कर्मचारी आणि शाळेचा ट्रस्टी अजून फरार आहे. शाळेच्या ट्रस्टींचा मानवी तस्करी, चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग आहे, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. मुबई उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष समितीसमोर अक्षय शिंदे गेल्यास या प्रकरणाला वेगळे वळण मिळू शकते, या भीतीने त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. हे प्रकरण तातडीने सीबीआयकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली.
ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून शिंदेला चौकशीसाठी पोलिसांच्या वाहनातून घेऊन जात होत. दरम्यान, मुंब्रा बायपासजवळ अक्षयने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. ठाणे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारच्या चकमकीचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे.
पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे. आपल्या मुलाचा मृत्यू हा गणवेशधारी लोकांनी केलेला निर्घृण खून आहे, असा दावा करत अक्षच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे.