Panic Buttons In Maharashtra Schools: बदलापूर बलात्कार प्रकरणावरून संताप व्यक्त होत असतानाच राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटनही बसवले जाणार आहे. यामुळे पोलिसांना त्वरीत गैरप्रकाराची माहिती मिळेल, अशी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच बदलापूर प्रकरणात कोणालाही वाचवले जाणार नाही. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
नुकतीच दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद पार पडली. दरम्यान, बदलापूर घटनेबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, 'राज्यातील सर्व शाळांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीप्रमाणेच पॅनिक बटन लावले जाणार आहे. हे प्रगत तंत्रज्ञान आहे. पॅनिक बटणद्वारे पोलिसांना गैरप्रकाराची त्वरीत माहिती मिळेल.' पुढे दीपक केसरकर म्हणाले की, 'मुंबई परिक्षेत्राच्या उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने बदलापूर घटनेचा तपास केला. या तपासात विविध विभागांचे लोक सहभागी झाले होते. कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करायचे, हे पोलिस ठरवतील. निष्काळजीपणा आढळलेल्याची सहआरोपी म्हणून ओळख पटली आहे. त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील.'
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, 'जे लोक आता टीका करत आहेत, त्यांनी आपल्या कार्यकाळात काहीही केले नाही. आम्ही अनेक कारवाया सुरू केल्या आहोत.' बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी महिला व बालकल्याण विभाग आणि शिक्षण मंत्रालयाने तयार केलेला अहवाल सोमवारी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
मुलांवरील लैंगिक अत्याचाराची माहिती मिळताच प्रत्येक प्राधिकरणाला पुढील कारवाईसाठी पोलिस अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे. परंतु, बदलापूर शाळा प्रशासनाकडून पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. पॉक्सो कायद्यातील कलम १९ मधील तरतुदींचे पालन न केल्याबद्दल बदलापूरच्या विशेष तपास पथकाने २३ ऑगस्ट रोजी शाळा प्रशासनाविरुद्ध एफआयआर दाखल केला. एसआयटीने दोन्ही अल्पवयीन मुलींसह त्यांच्या पालकांचे जबाबही नोंदवले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्यांविरोधात संतापजनक प्रतिक्रिया दिली. आमच्या मुलींवर हात ठेवणाऱ्यांना नपुंसक बनवले पाहिजे. मग ते पुन्हा असा गुन्हा करणार नाहीत. या घटनेनंतर मंगळवारी पुण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. हजारो लोकांनी रस्ते आणि रेल्वे रुळ रोखून धरले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विरोधी आघाडी महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. परंतु, राजकीय पक्ष किंवा कोणत्याही व्यक्तीला महाराष्ट्र बंद पुकारण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.