Akshay Shinde Father Writes to Amit Shah and Devendra Fadnavis: बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबांना धमक्या मिळत असल्याचा दावा करत पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना पत्र लिहिले आहे.
'माझ्या मुलाची हत्या राजकीय फायद्यासाठी करण्यात आली. मला आणि माझ्या कुटुंबाला धमक्या मिळत आहेत, त्यांचे वकील अमित कटारनवरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही धमक्या मिळत आहेत. धोका लक्षात घेता या सर्वांना पोलीस संरक्षण देण्यात यावे,' असे अक्षय शिंदेच्या वडिलांनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे.
बदलापुरातील एका नामांकित एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदे (वय, २४) याला अटक करण्यात आली. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून शिंदेला चौकशीसाठी पोलिसांच्या वाहनातून घेऊन जात होते. दरम्यान, मुंब्रा बायपासजवळ अक्षयने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला.
दरम्यान, राजकीय फायद्यासाठी आपल्या मुलाची हत्या करण्यात आली, अशी याचिका अक्षच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारले. अक्षयने पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे म्हटले आहे. तसेच सुरूवातीला अक्षय शिंदेला रोखण्यात का आले नाही, गोळी त्याच्या हातावर किंवा पायावर मारण्याऐवजी डोक्यात का मारली? असे अनेक प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केले.
अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला बदलापूरकरांनी विरोध केल्यानंतर त्याचा मृतदेहाला अग्नी न देता पुरण्यचा निर्णय घेण्यात आला. परंतु, कोणत्याही परिस्थितीत आरोपी अक्षय शिंदेचे मांजर्ली स्मशानभुमीत अंत्यविधी होऊ देणार नाही,असा आक्रमक पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. त्यानंतर कळवा, ठाणे येथील स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्यास अनेक संघटनांनी विरोध दर्शवला.