Badlapur Case : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे नामक सफाई कामगाराने दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. मंगळवारी बदलापूर येथे झालेल्या हिंसक आंदोलनामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या खवई या गावातील घरावर काही नागरिकांनी काल रात्री हल्ला करत तोडफोड केली आहे. अक्षयच्या घराला कुलूप असले तरी काही नागरिकांनी घराची तोडफोड केली. दरम्यान, शिंदे याच्या कुटुंबीय गावातून सुरक्षित स्थळी बाहेर गेले आहेत.
बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक छळाचे पडसाद संपूर्ण राज्यात पडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सफाई कामगार असलेला आरोपी अक्षय शिंदे (वय २४) ह्याला अटक केली असून त्याला कोर्टाने २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. आरोपीचे बदलापूर येथील मुखई गावात घर आहे. या घरात काल रात्री काही नागरिक शिरून त्यांनी त्याच्या घराची तोडफोड केली. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनाही गावातून बाहेर काढण्यात आले आहे. अक्षय शिंदेच्या घराला बाहेर कुलूप होतं, तरी सुद्धा घराच्या काचा फोडून आतल्या सामनाची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.
अक्षय शिंदे हा स्वच्छता पुरवणाऱ्या कंपनीमार्फत शाळेत सफाई कामगार म्हणून रूजू झाला होता. तो शाळेत साफ सफाई करण्याबरोबरच लहान मुला-मुलींना स्वच्छतागृहात घेऊन जात होता. सर्व मुलं त्याला काठिवाला दादा म्हणायचे. मात्र, त्याने दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. यानंतर संतप्त पालकांनी व नागरिकांनी त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन केले. या प्रकारचा वेगाने तपास करण्यासाठी एसआयटीची स्थपणा करण्यात आली आहे. तसेच खटला वेगाने चालवा या साठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बदलापूर अल्पवयीन मुली अत्याचार प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून या पथकानं पीडितांच्या पालकांची भेट घेतली. लैंगिक अत्याचार प्रकरणी पालकांनी बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली होती.