बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे आज पोलीस चकमकीत ठार झाला. तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस व्हॅनमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या कंबरेला असलेली बंदूक हिसकावून त्यांच्यावर तीन ते चार राऊंड फायर केले. यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केला आणि यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर बदलापूर शहरात आनंद साजरा केला गेला. आरोपीच्या मृत्यूनंतर बदलापूरमध्ये रस्त्यांरस्त्यांवर फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं.
बदलापुरातील काही नगरसेवकांनी फटाके फोडून जल्लोष केला. तर अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येत, एकमेकांना पेढे भरवून, पेढे वाटत आनंद व्यक्त केला.
बदलापूरमधील एका शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्यानंतर बदलापुरातील वातावरण तापलं होतं. बदलापूरकरांनी २० ऑगस्ट रोजी एकत्र येत शाळेवर हल्ला करत सामानाची तोडफोड केली होती. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्टेशनकडे वळवत रेल रोको आंदोलन केले होते. आरोपीला आताच्या आता फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या, असे म्हणत लोक आक्रमक झाले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवलं होतं. आज या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी चकमकीमध्ये ठार केले. ही बातमी बदलापुरात कळतात अनेकांनी जल्लोष केला शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद उत्सव साजरा केला. या प्रकरणी आंदोलन उभारणाऱ्या महिलांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
बदलापुरमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने लैंगिक अत्याचार केला होता. हा धक्कादायक प्रकार १३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणाचा एसआयटीकडून तपास सुरू होता. या तपासावेळी अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले. त्याच्याविरोधात तिने बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात ट्रान्झिट रिमांड देण्यात आला होता. बोईसर पोलीस ठाण्यातून हा गुन्हा बदलापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. नंतर ट्रान्झिट रिमांडसाठी अक्षय शिंदेला घेऊन जात असताना मुंब्रा बायपासजवळ आरोपीचा एन्काउंटरचा करण्यात आला.