बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर एन्काउंटरनंतर ५ दिवसानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. बदलापूर, ठाणे, कळवा व अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गट व स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अक्षय शिंदेला दफन करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे शांतीनगर स्मशानभूमी परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. पोलीस बंदोबस्तात शिंदेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर स्मशानभूमीत बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी सकाळी ११ वाजता खड्डा खणला जात होता. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक उपनगरांनी विरोध केल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार येथे करत असल्याची माहिती मिळताच स्थानिक लोक स्मशानभूमी परिसरात जमायला सुरूवात झाली.
शिंदे गटाचे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शांतीनगर स्मशानभूमीकडे धाव घेऊन खोदलेला खड्डा बुजविला. बदलापूर येथील राहणारा अक्षय शिंदे यांचे उल्हासनगरात अंत्यसंस्कार का? असा प्रश्न करत अंत्यसंस्कार करू देणार नाही. असा पवित्रा घेतला. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे पोलिसांनी नागरिकांची धरपकड केली. यावेळी नागरिकांनी अंत्यसंस्काराला विरोध करीत घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडले.
रविवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी अक्षयच्या नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला. शववाहिनीद्वारे मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला. तसेच बुजवण्यात आलेला खड्डा जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा खणण्यात आला. यावेळी नागरिकांनी शववाहिनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आरोपी अक्षय शिंदे याच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला होता. त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाईक जागेचा शोध घेत होते.
परंतु मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता. अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा करत त्याच्या वडिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. दोन दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी उल्हासनगर येथील शांतीनगर भागात जागा निश्चित करून अक्षयच्या मृतदेहावर अखेर अंत्यसंस्कार केले.