मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करणं अजय महाराज बारस्कर यांना महागात पडलं आहे. जरांगे यांच्यावरील टीकेमुळं संतापलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी बारस्कर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
अजय महाराज बारस्कर हे प्रहार जनशक्ती पक्षात सक्रिय होते. तसंच, त्यांच्यावर प्रहार वारकरी संघटनेचीही जबाबदारी होती. बारस्कर हे सुरुवातीपासून मराठा आंदोलनात सक्रिय होते. मात्र, आता त्यांचे जरांगे यांच्याशी मतभेद झाले आहेत.
राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण हवं, अशी त्यांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली व त्यांच्यावर समाजाचं नुकसान केल्याचे आरोपही केले.
जरांगे कॅमेऱ्यासमोर एक बोलतात आणि नंतर वेगळंच बोलतात. ते सतत पलटी मारतात. खोटं बोलतात. जरांगे यांना कायदा माहीत नाही. आयुष्यभर आंदोलन करून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्यांच्यामुळं समाजाचं नुकसान झालं आहे, असा आरोपही बारस्कर यांनी केला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर प्रहार जनशक्ती पक्षानं त्यांच्यावर कारवाई केली आहे.
पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र जवंजाळ यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या भूमिकेशी प्रहार जनशक्ती पक्ष सहमत नाही. प्रहार वारकरी संघटनाही त्यांचं समर्थन करत नाही. ते जे काही बोलले ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा आजपासून पक्षाशी काहीच संबंध राहणार नाही, असं बच्चू कडू यांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षण आणि मराठा नेत्यांबद्दल पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यानं जाहीर भूमिका मांडू नये. तसं केल्यास त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात येईल, असं प्रहार जनशक्ती पक्षानं स्पष्ट केलं आहे. या विषयावर फक्त पक्षाचे नेते बच्चू कडू हेच बोलतील, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या