मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोल्हापुरकरांचा नादच करायचा नाय! हत्तीवरून मिरवणूक काढत केले कन्या जन्माचे स्वागत

कोल्हापुरकरांचा नादच करायचा नाय! हत्तीवरून मिरवणूक काढत केले कन्या जन्माचे स्वागत

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 27, 2023 08:58 PM IST

Baby girl grand welcome : मुलीचे स्वागत हत्तीवरून मिरवणूक काढून व मोठ्या दिमाखात केले. तसेच यावेळी वेगवेगळे कार्यक्रमही घेण्यात आले.

हत्तीवरून मिरवणूक काढत केले कन्या जन्माचे स्वागत
हत्तीवरून मिरवणूक काढत केले कन्या जन्माचे स्वागत

समाजात एकीकडे नकोशी म्हणून झिडकरणाऱ्या, त्यांना जन्माआधीच आईच्या गर्भातच हत्या केल्या जात असताना कोल्हापुरातील एका कुटूंबाने स्त्री जन्माचे थाटात स्वागत करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. गेल्या काही दिवसात मुलगी जन्माचे अनोखे स्वागत केल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यात आता कोल्हापुरातील एका कुटूंबाची भर पडली आहे. येथे मुलीचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि हत्तीवरुन मिरवणूक काढत केले गेले. या स्वागताची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

गिरीष बाळासाहेब पाटील (मूळचे म्हाकावे ता.कागल, सध्या राहणार पाचगाव ता. करवीर) यांना तब्बल आठ वर्षांनंतर मुलगी झाली. म्हणून त्यांनी चक्क मुलीचे स्वागत हत्तीवरून मिरवणूक काढून व मोठ्या दिमाखात केले. तसेच यावेळी वेगवेगळे कार्यक्रमही घेण्यात आले. त्यांनी लेकीचे नाव ईरा असे ठेवले. कन्या जन्मामुळे आनंदित झालेल्या पाटील कुटुंबीयांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत, फुगड्या खेळत जल्लोषात पेढे वाटून तिचे घरी स्वागत केले.

 

गिरीष पाटील सध्या पुणे येथे आय टी कंपनीत कामाला असून त्यांच्या पत्नी सुधा चांगल्या शिकलेल्या आहेत. पाचगाव येथील गिरीष व मनीषा या दांपत्याला कन्यारत्न झाले. त्यांच्या कुटुंबात सुमारे ३५ वर्षांनंतर मुलगी जन्माला आली. त्यामुळे आनंदी झालेल्या पाटील कुटुंबाने तिच्या आगमनाचे स्वागत व तिचा गृहप्रवेश मोठ्या थाटामाटात व वाजतगाजत केला. तिचे ईरा असे नामकरण करण्यात आले.

WhatsApp channel