भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. बाबसाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर जमा होतात. त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच ५ डिसेंबर रोजी सायंकाळपासून व ६ डिसेंबर रोजी दिवसभर मुंबईत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील होलसेल व किरकोळ देशी, विदेशी मद्यविक्री, बीयर बार बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व मद्य दुकाने ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत, असे आदेश मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या आदेशानुसार, राज्य उत्पादन शुल्कचे डी विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील एन.एम जोशी मार्ग व वरळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व अबकारी अनुज्ञप्त्या, ई विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील भोईवाडा व माटुंगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ६ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवसभर बंद राहतील. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल,असेही जिल्हाधिकारी यादव यांच्या आदेशात नमूद आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी करावयाच्या सोयी सुविधांचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यांना भोजन, पेयजल, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा, राहण्याची सुविधा, वाहतूक व्यवस्था, मदत आणि समन्वय कक्ष, सुरक्षा व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या सुविधा पुरविताना कोणत्याही अनुयायाची गैरसोय होणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
महापरिनिर्वाण दिनाशी संबंधित सर्व समित्यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे,त्यांच्या सूचनांची दखल घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे. परिसरात पूर्ण स्वच्छता राखण्यात यावी. विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्यात यावेत, अशा सुचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
संबंधित बातम्या