zeeshan siddique removed as mumbai youth congress president : काँग्रेसने माजी नेते बाबा सिद्दीकी यांच्या पक्षांतराचा फटका हा त्यांच्या मुलाला बसला आहे. बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या मुलगा झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. हा निर्णय केंद्रीय काँग्रेस कमिटीने घेतला आहे. याचे पत्र हे पक्षाने मंगळवारी रात्री उशीरा जारी केले आहे. त्यांच्या जागी अखिलेश यादव यांची निवड करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला होता. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. असे असले तरी त्यांचा मुलगा झिशांन सिद्दीकी हा मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम होता. त्यामुळे दुखावलेल्या काँग्रेसत्यांनी आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर कारवाई केली आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार आहे. तसेच ते मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. मात्र, त्यांना आता या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे झिशान हे देखील काँग्रेसला राम राम करणार असल्याची चर्चा आहे. झिशान यांच्या जागी मुंबई युवक काँग्रेसची जबाबदारी ही खिलेश यादव यांना देण्यात आली आहे तर सुफियान मोहसीन हैदर यांच्याकडे मुंबई युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशापूर्वी अजित पवार हे वांद्रे येथील झिशान यांच्या कार्यालयात आले होते तेव्हा अजित पवार यांचे झिशान यांनी जंगी स्वागत केले होते. यामुळे काँग्रेसमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. झिशान यांनी आग्रहाने अजित पवार यांना त्यांच्या कार्यालयातील खुर्चीवर नेऊन बसवल्याने ते देखील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती.
बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे मुंबईतील दिग्गज नेते होते. त्यांनी १९९९ ते २००९ पर्यंत सलग तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली. बाबा सिद्दीकी यांनी महाराष्ट्रात काँग्रेस सरकारच्या काळात राज्य मंत्री म्हणून काम केले आहे. तर त्यापूर्वी ते १९९२ आणि १९९७ मध्ये ते नगरसेवकही देखील राहिले आहे. काँग्रेस सोडण्याआधी बाबा सिद्दीकी हे मुंबई प्रादेशिक काँग्रेस समिती आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.